डॉ. श्री बालाजी तांबे
मनुष्याने कितीही प्रगती केली असली, सर्व सजीवांत सर्वोच्च स्थान मिळविले असले, तरी त्यालाही प्राचीन काळापासून पशू-प्राण्यांची गरज कायम आहे. उपजीविकेचे साधन म्हणून, लढाईत उपयुक्त म्हणून, ज्याला पूर्णान्न समजले जाते अशा दुधाचा स्रोत म्हणून पशू उपयोगी असतातच, पण औषधोपचारांची योजना करतानाही अनेकदा पशूंची मदत घ्यावी लागते.
आयुर्वेदात पशुविज्ञान, पशुचिकित्सा वगैरे विषय विस्तृतपणे समजावले आहेत. गजायुर्वेद, गजपरीक्षा, अश्वतंत्र, अश्वायुर्वेद यासारखे अनेक ग्रंथ आहेत, ज्यावरून पशुधनाची काळजी घेतली जात असे हे स्पष्ट होते. या ग्रंथामध्ये प्राण्यांच्या निरनिराळ्या जाती, त्यांचे प्रजनन, त्यांचे रोग व त्यावरचे उपचार, त्यांच्यासाठी उत्तम असणारे भोजन, ताकद वाढविण्याची साधने, प्राण्याच्या दातावरून त्याचे वय जाणणे यासारख्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत.
वनस्पतींचे जसे फळ, फूल, मूळ वगैरे विविध अंगे औषधात वापरली जातात, तसेच प्राण्यांचेही दूध, मूत्र, शिंग, खूर, त्वचा, केस वगैरे भाग औषध म्हणून वापरले जातात. अर्थातच औषध म्हणून वापरण्यापूर्वी यावर संस्कार करणे आवश्यक असते. उदा. साधे दूध असले, तरी ते धारोष्ण असेपर्यंतच जसेच्या तसे वापरता येते. अन्यथा उकळी आणूनच वापरायचे असते. गोमूत्र सुती कापडातून गाळून घेऊन पाणी, दूध वगैरे मिसळूनच घ्यायचे असते वगैरे.
पूर्णान्न दूध प्राण्याकडून समस्त मानवजातीला मिळालेली सर्वोत्तम देणगी म्हणजे दूध. दूध हे पूर्णान्न तर असतेच, पण रोगांचा प्रतिबंध होण्यासाठी आणि अनेक रोगांवर औषध म्हणूनही उपयोगी असते. गाय, म्हैस, बकरी, उंटीण, मेंढी, घोडी, हत्तीण व स्त्री अशा आठ प्राण्यांचे दूध उपयोगात आणतात. प्रत्येक प्राण्याच्या दुधाचे गुणधर्म वेगवेगळे असतात, पण दुधाचे सामान्य गुण पुढीलप्रमाणे होत,
तत्त्वनेकौषधिरसप्रसादं प्राणदं गुरु ।ं पिच्छिलं शीतं स्निग्धं श्लक्ष्णं सरं मृदु ।।
सर्वप्राणभृतां तस्मात् सात्म्यं क्षीरमिहोच्यते ।
...सुश्रुत सूत्रस्थान
दूध हे अनेक वनस्पतींच्या रसाच्या (प्राणी ज्या वनस्पती खाते त्यांच्या) सत्त्वाप्रमाणे असते. सर्व प्राणिमात्रांना जीवन देणारे असते. चवीला गोड, वीर्याने शीतल, स्निग्ध, मृदू, सारक गुणाचे असते आणि सर्व प्राणिमात्रांना मानवणारे असते.
दुधाप्रमाणेच काही विशिष्ट प्राण्यांची मूत्रे सुद्धा अत्यंत औषधी असतात. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, हत्तीण, घोडी, गाढवीण व उंटीण अशा आठ प्राण्यांची मूत्रे औषधात वापरली जातात. प्राण्याचे आरोग्य उत्तम आहे आणि प्राण्याचा आहार चांगला आहे याची खात्री करून स्वच्छ भांड्यात गोळा केलेले मूत्र संस्कार शुद्धी करून औषध म्हणून वापरता येते. मूत्राचे सामान्य गुण याप्रमाणे होत,
तत् सर्वं कटु तीक्ष्णोष्णं लवणानुरसं लघु ।शोधनं कफवातघ्नं कृमिमेदोविषापहम् ।।
अर्शो जठरगुल्मघ्नं शोफारोचकं नाशनम् ।पाण्डुरोगहरं भेदि हृद्यं दीपनपाचनम् ।।
...सुश्रुत सूत्रस्थान
सर्व मूत्रे तीक्ष्ण व उष्ण असतात, चवीला किंचित खारट असतात, पचण्यास हलकी असतात, कोठ्याची शुद्धी करणारी असतात, कफदोष व वातदोषाचे शमन करतात; जंत, वाढलेला मेदधातू व साठलेली विषद्रव्ये दूर करतात. मूळव्याध, जलोदर (पोटात पाणी होणे), गुल्म, सूज, तोंडाला चव नसणे, पांडुरोग वगैरे रोगात औषध म्हणून वापरता येतात, हृदयासाठी.चांगली असतात, अग्नी प्रदीप्त करतात, पचनासही मदत करतात.
आणखी काही औषधी भाग
गोरोचन - हा सुद्धा प्राण्यापासून मिळणारा औषधी पदार्थ होय. गायीच्या पित्ताशयात जे पित्ताचे खडे होतात ते गोरोचन होत.
गोरोचना च शिशिरा विषदोषघ्नी रुच्या च पाचनकरी क्रिमिकुष्ठहन्त्री ।भूतग्रहोपशमनं कुरुते च पथ्याश्रृरमलकरी जनमोहिनी च ।। ...राजनिघण्टु
गोरोचनाच्या खड्यांना मंद सुगंध असतो. ते गुणाने थंड असतात. त्रिदोषांचा नाश करतात. चवीला रुचकर असतात. पाचक असतात. जंत, त्वचारोगाचा नाश करणारे असतात. भूतबाधा, ग्रहबाधा म्हणजेच अदृश्य जंतूंपासून, वाईट शक्तींपासून संरक्षण करतात; मंगलकर असतात आणि मन मुग्ध करणारे असतात.
कस्तुरी - अजून एक अतिशय सुगंधी व प्राण्यापासून मिळणारे वीर्यवान औषधी द्रव्य म्हणजे कस्तुरी. कस्तुरी मृगाच्या नाभीपासून मिळते व तिच्या ठायी अप्रतिम सुगंध असतो.
कस्तुरी सुरभिस्तिक्ता चक्षुष्या मुखरोगजित् । किलासकफदौर्गंन्ध्यं वातालक्ष्मीमलापहा ।।
...राजनिघण्टु
कस्तुरी डोळ्यांसाठी उत्तम असते, मुखरोग दूर करते, अवघड त्वचाविकार, कफविकार, दुर्गंधी, वातरोग वगैरेत हितकर असते; दारिद्य्राचा व विषद्रव्यांचा नाश करते.
सांबरशिंग - सांबर म्हणून हरणाचा प्रकार असतो, त्याचे शिंगसुद्धा खूप औषधी असते. यालाच मृगशृंग असेही म्हणतात. सांबरशिंगाचे भस्म करून वापरायचे असते. मृगशृंग हृदयाची ताकद वाढविण्यासाठी उत्तम असते. मृगशृंग ताप उतरवते, खोकला कमी करते, शक्ती वाढवते. बाळाला गुटीत मृगशृंग उगाळून देण्याची पद्धत असते.
औषधी योग
याखेरीजही अनेक औषधी योगात प्राण्यांपासून मिळणाऱ्या द्रव्यांची योजना केलेली आढळते. त्यातील काही योग याप्रमाणे होत. अर्थात बऱ्याच वेळा इतर औषधी योग उपलब्ध नसतात. अशा वेळी हाताशी उपलब्ध प्राणिज वस्तू उपयोगी पडतात.
- निष्पीड्य वाससा सम्यक् वर्चो रासभवाजिनोः ।रसस्या कुडवं तस्य पिबेत् मूत्ररुजापहम् ।।...सुश्रुत उत्तरतंत्र
गाढव व घोडा यांची ताजी लीद वस्त्रातून पिळून रस काढावा. असा रस 16 तोळे (160 ग्रॅम) एवढ्या प्रमाणात घेतल्यास मूत्रप्रवृत्तीच्या वेळी होणाऱ्या वेदना बंद होतात.
- उचकी न थांबल्यास रुग्णाची अतिशय दूरवस्था होतो. उचकी थांबण्यासाठी सुश्रुतसंहितेत पुढील उपाय दिलेला आहे.
.........गोविषाणोद्भवं वा ।सर्पिः स्निग्धैश्चर्मबालैः कृतं वा ।।
...सुश्रुत उत्तरस्थान
गायीचे शिंग किंवा तूप लावलेले केसासह बैलाचे कातडे जाळून त्याची धुरी दिल्यास उचकी थांबते.
तद्वत् छाविन्मेषगोशल्लकानांरोमाणि अन्तर्धूमदग्धानि चात्र ।ध्वाज्याक्तं.....।।
...सुश्रुत उत्तरस्थान
साळू नावाच्या प्राण्याच्या अंगावरचे काटे, मेंढा व बैल यांचे केस जाळून केलेले भस्म मधात मिसळून चाटवावे. यामुळेही उचकी थांबते.
- मंडूर म्हणजे लोखंडाचा गंज गोमूत्रात महिनाभर भिजत घालावा, नंतर त्याचे बारीक चूर्ण करून त्यात सैंधव मिसळावे व गोमूत्रासह प्यावे. यामुळे कावीळ, विशेषतः "कुंभकामला' नावाची कावीळ बरी होते.
- प्रमेहावर उपचार सांगताना सुश्रुतसंहितेत सांगितले आहे,
श्यामाकनीवारवृत्तिःआमलक-कपित्थ-तिन्दुक-अश्मन्तक-फलाहारो मृगैः सह वसेत ।
सावे, देवभात वगैरे तृणधान्य आणि आवळा, कवठ, टेंभुर्णी, आपटा वगैरे फळे यांचे सेवन करत रानात हरणांच्या कळपाबरोबर राहावे.
हरणांची चपळता आपण जाणतोच. हरणांच्या मागोमाग दिवसभर फिरल्याने जो व्यायाम होईल आणि रानात राहिल्याने आहारावर नियंत्रण येईल, त्यामुळे प्रमेहासारखा अवघड रोग सुद्धा बरा होण्याची शक्यता वाढेल.
- उंटिणीचे मूत्र पिऊन ते जिरल्यावर दूध पिऊन राहावे. याप्रमाणे सहा महिने फक्त उंटिणीचे मूत्र व दूध एवढाच आहार घेतल्यास ज्यात किडे झाले आहेत असे त्वचारोगही बरे होतात असे सुश्रुतसंहितेत सांगितलेले आहे.
-गोखरूचे चूर्ण मधात मिसळून मेंढीच्या दुधासह आठवडाभर घेण्याने मूतखडा नाहीसा होतो.
- चतुष्पदानां त्वग्रोमखूरश्रृास्थिभस्मना ।तैलाक्ता चूर्णिता भूमिर्भवेत् रोमवती पुनः ।।
खूर असणाऱ्या चार पायांच्या प्राण्यांची त्वचा, केस, खूर, शिंग आणि हाडे यांचे भस्म बनवावे. हे भस्म तेलात मिसळून लेप केल्यास केस उगवतात.
- युक्तं वा मधुसर्पिभ्यां लिह्यात् गो-अश्वशकृत् रसम् ।
...चरक चिकित्सास्थान
रक्तपित्ताच्या विकारावर गायीच्या शेणाचा व घोड्याच्या लिदेचा रस मध-तुपासह सेवन करावा.
- प्रमेहावर उपचार सांगताना चरकाचार्यांनी एक आगळा वेगळा उपाय सांगितलेला दिसतो, की गाढव, घोडा, हंस, हरिण या प्राण्यांना जव खाऊ घालावेत. त्यांच्या मळाबरोबर बाहेर आलेले जव गोळा करावेत व त्याच्यापासून अन्न बनवून कफामुळे प्रमेह झालेल्या व्यक्तीला खाऊ घालावेत. प्राण्यांच्या शरीरातील अग्नीचा संस्कार झाल्याने असे जव औषधाप्रमाणे उपयोगी पडतात.
- उद्दालनं श्वदन्ता गोश्ववराहोष्ट्रदन्ताश्च ।...चरक चिकित्सास्थान
कुत्रा, गाय, घोडा, डुक्कर, उंट यांचे दात उगाळून लेप केल्यास त्वचारोग बरे होतात.
- कुञ्जरस्य पुरीषं तु घृतं सर्जरसस्तथा ।...चरक चिकित्सास्थान
हत्तीची लीद, तूप, राळ या सर्व गोष्टी एकत्र करून त्याची धुरी दिल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो.
- गोखराश्वशकृत् पिण्डैस्तिलकल्कैस्तुषैस्तथा ।
गाय, गाढव, घोडा यांच्या लिदेचा पिंड बनवून शेक घेतल्यास मूळव्याधीमुळे आलेली सूज व वेदना कमी होतात.
अशा प्रकारचे अनेक योग आयुर्वेदाच्या ग्रंथात सापडतात व त्यावरून प्राणी आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी पडतात हे लक्षात येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकारे प्राण्यांचा उपयोग करून घेताना त्याला मारण्याची किंवा इजा पोचविण्याची वश्यकता नसते. जसे केस कापल्यावर आपल्याला इजा होत नाही, तसेच हरिण वगैरे प्राण्यांची शिंगे आपोआप गळून पडतात, दात, कातडे, खूर वगैरे गोष्टी प्राणी नैसर्गिक पद्धतीने मृत्यू पावल्यावरही काढून घेता येतात व वापरता येतात. सध्याच्या आधुनिक जीवनात बरेचसे प्राणिज योग आश्चर्यकारक किंवा कदाचित काही व्यक्तींना किळसवाणे वाटतील, पण जीव वाचवायचा असला तर सर्व बाजूंनी उपचार करावाच लागतो.
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज,
कार्ला 410 405
www.ayu.de डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)