मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर झाला ग्रुप कॅप्टन!
वृत्तसंस्था
Friday, September 03, 2010 AT 05:32 PM (IST)
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचा सदस्य झाल्याचा मला अभिमान आहे. आयुष्यातील हा सर्वोच्च सन्मान आहे. माझे स्वप्नचं सत्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने शुक्रवारी येथे व्यक्त केली.
सचिनला शुक्रवारी येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक यांच्या हस्ते मानद ग्रुप कॅप्टन पद देण्यात आले. मानद ग्रुप कॅप्टन हे पद मिळणारा सचिन हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
भारतीय हवाई दलाने जानेवारीमध्ये सचिनला मानद ग्रुप कॅप्टन पद देण्याची घोषणा केली होती. नामांकित व्यक्तींनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून त्यांना सशस्त्र दलांकडून मानद पदे दिली जातात. जास्तीत जास्त तरुणांनी हवाई दलामध्ये यावे, या उद्देशाने सचिनला हे पद देण्यात आले.
तरुणपणापासून मला लढाऊ विमाने आणि बाईक्सचे विशेष आकर्षण होते. १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका लढाऊ विमानामध्ये पहिल्यांदा बसण्याचा योग आला. विमानातून उड्डाण करताना खरंतर मी खूप घाबरलो होतो. याआधी मी कोणालाही हे सांगितले नव्हते, असे त्याने या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगितले.