Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

राष्ट्रकुलपूर्वीच चार कुस्तीगीर उत्तेजक चाचणीत दोषी
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 03, 2010 AT 12:00 AM (IST)

नवी दिल्ली - अवघ्या पाच दिवसांपूर्वी "अर्जुन' पुरस्काराने गौरविलेल्या राजीव तोमरसह भारताचे चार कुस्तीगीर उत्तेजक चाचणीत दोषी ठरले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर हे प्रकरण उघडकीस आल्याने कुस्तीत सर्वाधिक पदके जिंकण्याची आशा बाळगणाऱ्या भारतीय संघाच्या तयारीलाच धक्का बसला. अर्थात, भारतीय कुस्ती महासंघाने या चौघांना तातडीने संघातून डच्चू दिला. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेतील चाचणीत त्यांनी उत्तेजक घेतले असल्याचे आढळले.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील सुमित (74 किलो), मौसम खत्री (96 किलो), राजीव तोमर (120 किलो), गुरशरणप्रीत कौर (महिला 72 किलो) हे चौघे उत्तेजक चाचणीत दोषी ठरले असल्याचा अहवाल राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने दिला आहे. या सर्वांनी बंदी घातलेल्या मेथील हेक्‍सा निमाईन या उत्तेजकाचे सेवन केले असल्याचे आढळले. राजीवचा रविवारी "अर्जुन' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. त्याने मे महिन्यात झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले होते. ""राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील चौघे उत्तेजक चाचणीत दोषी ठरले आहेत,'' असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष जी. एस. मंढेर यांनी जाहीर केले.

या खळबळजनक घटनेनंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या निवड समितीने खाशाबा जाधव कुस्ती स्टेडियममध्येच तातडीची बैठक बोलावून चार नव्या खेळाडूंची निवड केली. त्यानंतर नरसिंग पंचम यादव (74 किलो), अनिल मान (96 किलो), प्रवीण (120 किलो) व अंशू तोमर (72 किलो) यांचा संघात समावेश करण्यात आल्याचे जाहीर केले. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी एकंदर 21 कुस्तीगिरांचा संघ निवडण्यात आला आहे. त्यात सात महिला खेळाडू आहेत. अर्थातच भारताच्या सर्वाधिक आशा ऑलिंपिक ब्रॉंझविजेत्या सुशील कुमार (66 किलो फ्रीस्टाईल) याच्यावर आहेत.

आदिती मुटाटकरचा समावेश
भारतीय बॅडमिंटन संघात महाराष्ट्राच्या आदिती मुटाटकरचा समावेश करण्यात आला आहे. अर्थात, या स्पर्धेत भारताची मदार साईना नेहवाल आणि चेतन आनंद यांच्यावर असेल. भारतीय संघ, पुरुष ः चेतन आनंद, पी. कश्‍यप, सानवे थॉमस, रूपेश कुमार, व्ही. दिजू. महिला ः साईना नेहवाल, आदिती मुटाटकर, ज्वाला गुत्ता, अश्‍विनी पोनप्पा, अपर्णा बालन. प्रशिक्षक ः पी. गोपीचंद, अतिक जौहरी, पी. व्ही. भास्कर बाबू, विजयदीप सिंग, अर्चना देवधर. व्यवस्थापक ः प्रदीप गंधे.
 
सौरभ विज, आकाश अंतिलही दोषी
ऍथलेटिक्‍स संघातील गोळाफेक खेळाडू सौरभ विज आणि आकाश अंतिल हे दोघे गेल्या महिन्यात "नाडा'नेच घेतलेल्या चाचणीत दोषी आढळले आहेत. या दोघांचा राष्ट्रकुल संघात समावेश होता. भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, सचिव रवींद्र चौधरी यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांना संघातून वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: