'ते' प्रकरण मिटविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून खंडणी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:30 AM (IST)
कोल्हापूर - माजी महापौरांनी महिलेला नदीत फेकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केलेले प्रकरण मिटविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केली जात असल्याची चर्चा आहे. पाच लाखांवर तोडपाणी झाली असून ही रक्कम व्यापाऱ्यांनीच गोळा करून द्यावी, यासाठी दबाव सुरू असून व्यापाऱ्यांच्या एका असोसिएशनच्या अध्यक्षांनीच ही सुपारी घेतल्याचे समजते. 'कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे' याप्रमाणे सुरू असलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांत मात्र संतापाची लाट आहे.
गेल्या शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास या माजी महापौरांनी एका महिलेला नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवरील औरवाड पुलावरून ढकलून दिले. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच या महिलेचा जीव वाचला. हे प्रकरण शिरोळ पोलिस ठाण्यात गेले, पण ते अंगलट येणार असे लक्षात येताच या माजी महापौरांनी त्या महिलेची मनधरणी केली. त्यामुळे जीव घेणारा हा माजी महापौर या महिलेलाही देवदूत वाटला आणि तिनेही या प्रकरणी कोणतीही तक्रार केली नाही.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या महिलेने या महापौरांच्या चौकातील कार्यालयात धडक मारली. त्या ठिकाणी तडजोड सुरू असताना ती फिस्कटल्याने या कार्यालयातच त्या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाने गांगरलेल्या या माजी महापौरांनी मग तडजोडीची तयारी दर्शवली. संबंधित महिलेने सात लाख रुपयांची मागणी केली, पण एवढी रक्कम देणार नसल्याचे या माजी महापौरांनी सांगितले. काही मध्यस्थांमार्फत ही तडजोड पाच लाखांना ठरली. मात्र या रकमेसाठी आता व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात आहे.
व्यापाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्याकडून प्रत्येकी 20 हजार रुपये उद्या सायंकाळपर्यंत पोच करण्याचे आदेशच दिले आहेत. पैसे न दिल्यास आपल्याशी गाठ असल्याचा संदेशही या व्यापाऱ्यांपर्यंत पोचवण्यात आला आहे. परगावाहून कोल्हापुरात व्यवसायासाठी आलेले व्यापारी घाबरून गेले आहेत. या व्यापाऱ्यांच्या असोसिएशनच्या अध्यक्षानेच या खंडणी वसुलीची सुपारी घेतल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात आहे.
संबंधित महिलेवर हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी प्रचंड दबाव आणण्यात आला आहे. तिच्या कुटुंबीयांनाही हे प्रकरण मिटवून घेण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे ती महिला किंवा कुटुंबीय पोलिसांत जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. नेमका याचाच फायदा घेऊन हे प्रकरण पैसे देऊन मिटवले जाते, त्यासाठी मात्र व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार संतापजनक आहे.
कोठे आहेत महिला संघटना?
कोल्हापुरात महिलांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. नवऱ्याने त्रास दिला तरी त्याला धडा शिकवण्याची ताकद या महिला संघटनांत आहे. वृत्तपत्रात आलेल्या अनेक बातम्यांवरून या संघटनांनी काही महिलांना न्याय मिळवून दिल्याची प्रकरणे ताजी आहेत. पण एका महिलेला थेट पुराच्या पाण्यात ढकलून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न या शहराचे प्रथम नागरिक पद भूषवलेल्या व्यक्तीकडून झाले असताना या महिला संघटना गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे.