Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

डॉ. विजयकुमार गावित निष्क्रिय मंत्री
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 01:27 AM (IST)

धुळे -  आरोग्य सेवेचे पुण्यकर्म करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत सर्वच शासकीय जिल्हा रुग्णालये, रुग्णांना वेठीस धरणारे राज्य शासन, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे निष्क्रिय ठरल्याचा गंभीर आरोप माजी केंद्रीय वित्त मंत्री तथा अमरावतीचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज येथे केला. या प्रश्‍नी शिवसेनेचे येथे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, तर सर्वत्र जनक्षोभ उसळेल. मग, किती जणांवर गुन्हे दाखल करण्यास शासन, प्रशासन पुरे पडते हे पाहू, असा गर्भित इशाराही श्री. अडसूळ यांनी दिला.

राज्यात जिल्हा रुग्णालये, स्वच्छतेसह आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजत असताना "शासन काय झक मारते का'?, अशा शब्दात श्री. अडसूळ यांनी संताप व्यक्त केला. माझ्या आमदार मुलाने राज्यातील सर्व शासकीय जिल्हा रुग्णालयांची गंभीर स्थिती सुधारण्याबाबत विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविला. त्यावेळी मंत्री. डॉ. गावित यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याचा प्रयत्न होता. परंतु, अपेक्षित स्थिती सुधारण्याची ग्वाही डॉ. गावित यांनी दिल्याने आक्रमक पावले मागे घेण्यात आली. परंतु, शासनासह मंत्री डॉ. गावित यांनी याप्रश्‍नी दुर्लक्ष केल्याने ते निष्क्रिय ठरले आहेत. रुग्णालयांसह रुग्णांना वेठीस धरून गळचेपी करत असल्याचा आरोप श्री. अडसूळ यांनी केला. हा प्रश्‍न केंद्र शासनाकडे नेईल, असे ते म्हणाले.

डॉ. गुप्तांची विनवणी
शिवसेनेच्या येथील बेमुदत आंदोलनाच्या सातव्या दिवशी सहभाग नोंदवून दुपारी एका स्थानिक अधिवेशनाकडे मार्गस्थ होणारे श्री. अडसूळ यांची रुग्णालयात आंदोलनस्थळी हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा रुग्णालय अधीक्षक डॉ. एस. एस. गुप्ता यांनी भेट घेतली. त्यावेळी हतबल डॉ. गुप्ता यांनी स्थिती सुधारण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून आता, तरी हे आंदोलन थांबविण्यास सहकार्य करावे. शासनाप्रमाणे आपणही तारणहार असून रुग्णालयाचे विविध प्रश्‍न मार्गी लावावेत, अशी हात जोडून विनवणी केली.

अडसूळ यांचाही संताप
जिल्हा रुग्णालयाची स्थिती व अनागोंदी कारभाराबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी, ज्येष्ठ डॉ. सुभाष भामरे आदींकडून माहिती घेतल्यावर श्री. अडसूळ यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की राज्य शासन, पोलिस अथवा शासकीय यंत्रणेकडून शिवसेनेचे हे रुग्ण लाभासह जनहितासाठीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, तर जनक्षोभ उसळेल. आंदोलनातून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, अधिक निधीची उपलब्धता, औषधांचा तुटवडा, साहित्य व यंत्रसामग्रीसंदर्भात प्रश्‍न सुटणार आहेत. शासनाने, मंत्री डॉ. गावित यांनी याप्रश्‍नी गंभीर होण्याऐवजी, तत्काळ निर्णय घेऊन रुग्णांना दिलासा देण्याऐवजी ते दुर्लक्ष करत असतील, तर सर्वत्र जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही. शासनाच्या व जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे गंभीर स्थिती ओढवल्याचे उपस्थित काही वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही श्री. अडसूळ यांना सांगितले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: