Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गुणवंत शिक्षक निवडीच्या मूल्यांकनात फेरफार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 01:24 AM (IST)

नाशिक  -  गुणवंत शिक्षक पुरस्कार निवड करताना मूल्यांकनात झालेल्या फेरफारमुळे पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या सर्वच प्रस्तावांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे यांनी घेतला आहे. त्यामुळे यंदा शिक्षकदिनी होणारा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमही स्थगित करण्यात आला आहे.

गुणवंत शिक्षक निवडताना एकही वर्ष तक्रारीविना गेले असे आजपर्यंत घडले नाही, हेच या वर्षीही दाखवून दिले असून, मूल्यांकनात झालेले फेरफार हे त्याचे बोलके उदाहरण ठरावे. शिक्षकांची निवड करताना प्रत्येक तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तीन प्रस्ताव जिल्हा निवड समितीकडे मागविण्यात आले होते. त्यानुसार असे तीन-तीन प्रस्ताव तालुकास्तरावरून प्राप्तही झाले. काल (ता. 2) गुणवंत शिक्षक निवडीबाबतची बैठकही अध्यक्ष मायावती पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यास शिक्षण समिती सभापती दिलीप थेटे, महिला व बालविकास समितीच्या सभापती संगीता पाटील, समाजकल्याण समितीचे सभापती वसंत वाघ यांच्यासह प्राथमिक शिक्षणाधिकारी जे. के. देवरे उपस्थित होते. या निवड समितीच्या बैठकीत 15 तालुक्‍यांतून 15 शिक्षकांची अंतिम निवडही करण्यात आली होती. मग एका रात्रीतून असे नेमके काय बदल घडले वा फेरफार आढळून आले, की हे निवड झालेले पुरस्कार रद्द करण्याची वेळ निवड समितीवर यावी.
 
तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत प्राप्त प्रस्तावांची छाननी व पडताळणी होऊन तीन-तीन प्रस्ताव जिल्हा निवड समितीकडे पाठविले जातात. अशी सर्वसाधारण निवड प्रक्रिया आहे; परंतु जिल्हा निवड समितीमार्फतही अशा शिक्षकांची पडताळणी केली, तर असे प्रसंगच उद्‌भवणार नाहीत, अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे. पुरस्कार निवडीबाबत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक, शिक्षक संघटना, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांच्याही तक्रारी प्राप्त झाल्याने तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केलेल्या पडताळणीत त्रुटी आढळून आल्याने प्राप्त सर्व प्रस्तावांची पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष पगारे यांनी दिली. त्यामुळे 5 सप्टेंबर शिक्षकदिनी होणारा आदर्श शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी कळविले आहे.

शिक्षकांना निवडीची खबर
काल निवड समितीची बैठक होऊन त्यात आदर्श शिक्षकांची नावे अंतिम करण्यात आल्यानंतर लगेचच सिन्नर, त्र्यंबकेश्‍वर आणि इगतपुरी येथील संबंधित शिक्षकांपर्यंत ही वार्ता पोचली आणि त्यांनी पेढे वाटून स्वत:च्या पाठीवर शाबासकीची थापही मारून घेतली. यामुळे निवड समितीने नावे अंतिम केल्यानंतर त्यातील गोपनीयतेचा तर भंग झालाच शिवाय ही माहिती शिक्षण विभागातून संबंधित शिक्षकांपर्यंत कशी गेली, याचा शोध घेण्याची गरज आहे.

...तर संबंधितांवर कारवाई
मूल्यांकनात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी फेरफार करून चुकीच्या शिक्षकांची निवड केल्याचे फेरपडताळणीत आढळून आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण सभापती दिलीप थेटे यांनी "सकाळ'शी बोलताना दिला.
 

 
प्रतिक्रिया
On 04-09-2010 11:20 खुळे नंदकुमार said:
यामुळेतर चांगल्या शिक्षकांना पुढे येता येत नाही


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: