अंतुर्ली येथे खडसेंच्या सभेत गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:15 AM (IST)
अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) - येथे आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या भाजपप्रणीत ग्राम विकास पॅनलच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या जाहीरसभेचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी आपल्या भाषणातवॉर्ड सहामधील प्रतिस्पर्धी दोन उमेदवारांबद्दल अपशब्द वापरल्याने काही ग्रामस्थ संतप्त झाले. यामुळे त्यांना सभा आटोपती घ्यावी लागली. हा प्रकार आज रात्री नऊच्या सुमारास घडला.
आज रात्री आठच्या सुमारास येथील बसथांबा चौकात श्री. खडसे यांची ग्रामपंचायतीच्या निवडणूक उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत त्यांनी आपल्या भाषणात प्रतिस्पर्धी विरोधी पक्षातील पॅनलच्या वॉर्ड सहामधील दोन उमेदवारांविरुद्ध अपशब्द वापरल्याने यात एक महिला व एका तरुण उमेदवाराचा समावेश आहे. खडसेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत दुहेरी शब्दप्रयोगाचा वापर करीत प्रतिस्पर्धी उमेदवारांची टिंगल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही खडसेंची कोपरखळी तेथे उपस्थित काहींच्या लक्षात आले आणि बघता बघता सुमारे तीनशे लोकांचा जमाव संतप्त झाला होता. त्यामुळे सभा आटोपती घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्री. खडसे यांना सभास्थानाजवळील एका केळी ग्रुपमध्ये बसविले व काही वेळात गाडीत बसवून मुक्ताईनगरकडे रवाना केले. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभेनंतर गावात याबाबत एकच चर्चा होती.
निवडणुकीत असले प्रकार होतातच - खडसे
दरम्यान, विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सभा आटोपल्यानंतर मी गेल्यावर काही लोक दारू पिऊन शिवीगाळ करीत होते. पक्षाचे कार्यकर्ते होते पण कोणीही विरोध केला नाही. निवडणुकीच्या काळात असले प्रकार होतच असतात. पोलिस कारवाई करीत आहे. तालुका माझाच आहे. असेही श्री. खडसे यांनी "सकाळ'ला सांगितले.