उस्मानाबाद जिल्ह्यात होणार उद्या मतदान
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:30 AM (IST)
उस्मानाबाद - जिल्ह्यातील 365 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व तीन गावांतील तीन प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी एक हजार 274 मतदान केंद्रावर रविवारी (ता. पाच) मतदान होणार आहे. सोमवारी (ता. सहा) सकाळी आठला मतमोजणीला सुरवात होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर होत असल्यामुळे मतमोजणीही काही तासातच होणार असल्याने निकाल लवकर जाहीर होणार आहेत.
जिल्ह्यातील सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये (2010) मुदत संपणाऱ्या 425 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक व सात ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, परंडा, वाशी या आठ तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता 365 ग्रामपंचायतीसाठी रविवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे.
शुक्रवारी (ता. तीन) जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तहसील कार्यालयात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभर तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. शनिवारी (ता. चार) सायंकाळी पाचपर्यंत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मतदान यंत्र, कर्मचारी केंद्रावर दाखल होणार आहेत.
जिल्ह्यातील एक हजार 274 मतदान केंद्रापैकी 78 केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे या केंद्रावर विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील जागजी, हिंगळजवाडी, खामगाव, गोवर्धनवाडी, बेंबळी, अनसुर्डा, मेडसिंगा, आंबेवाडी, वडगाव (सिद्धेश्वर), आळणी, घाटंग्री या केंद्राचा समावेश आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, सिंदफळ, कसई, पिंपळा (खु.), खडकी, तामलवाडी, अणदूर, सलगरा, दिंडेगाव, आरळी (बु.). उमरगा तालुक्यातील जगदाळवाडी, आष्टा, मुळज, गुंजोटी, कवठा, बलसूर, तुरोरी, जकेकूर, कुन्हाळी. लोहारा तालुक्यातील आष्टाकासार, भातागळी, धानोरी, भातागळी, कानेगाव. कळंब तालुक्यातील ईटकूर, कन्हेरवाडी, हावरगाव, पिंपळगाव (डोळा), आडसूळवाडी, भाटसांगवी, बहुला, मंगरूळ, रांजणी, पाडोळी, ताडगाव, देवधानोरा, भाटशिरपुरा, चोराखळी. भूम तालुक्यातील ईट, लांजेश्वर, रामकुंड, अंजनसोंडा, रामेश्वर, वरूड, पाथरूड, जयवंतनगर, माणकेश्वर, आष्टा, तिंत्रज. वाशी तालुक्यातील तेरखेडा, खामकरवाडी, पारगाव, इंदापूर, सरमकुंडी, मांडवा. परंडा तालुक्यातील जवळा, कौडगाव, वाकडी, नालगाव, आनाळा, डोंजा, तांदूळवाडी ही 78 गावे संवेदनशील आहेत.
सोमवारी (ता. सहा) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. उस्मानाबाद, लोहारा, वाशी या तीन तालुक्यातील मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात होणार आहे. तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात होईल. उमरगा तालुक्यातील अंतुबळी पतंगे सांस्कृतिक सभागृहात होईल. कळंब, भूम, परंडा तालुक्यातील मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होईल.
संवेदनशील केंद्रावर विशेष सुरक्षा
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणारी जिल्ह्यातील 78 गावे संवेदनशील असल्यामुळे तेथील मतदान केंद्रावर विशेष बंदोबस्त ठेवला जाणार आहे. महाराष्ट्र पोलिस, राज्य राखीव दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार आहे. अन्य केंद्रावर एक जवान तैनात असेल परंतु संवेदनशील केंद्रावर दोन ते तीन जवान तैनात करण्यात आले आहेत.