Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गंगापूरच्या डाळिंबांना मिळाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:45 AM (IST)

गंगापूर - पारंपरिक अडत व्यवसायाकडून शेतीकडे वळालेल्या गंगापूरच्या नावंदर बंधूंनी अंबेवाडीच्या माळरानावर फळबाग फुलविली आहे. विशेषतः डाळिंबाचे दर्जेदार उत्पन्न घेऊन खासगी निर्यातदारांमार्फत येथील डाळिंबांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली. खत, पाणी आणि निगा राखण्यासाठी आवश्‍यक सर्व बाबींचे सुयोग्य व्यवस्थापन करून पहिल्याच बहारात महेश नावंदर व श्रीकांत नावंदर या चुलत्या-पुतण्याने पाच एकरांत लाखो रुपयांचे उत्पन्न काढले. या कामी नंदलाल नावंदर यांचा खंबीर पाठिंबा या दोघांना लाभला. या प्रेरणेतून आसपासचे शेतकरी डाळिंब शेतीकडे वळाले आहेत. तालुक्‍यात नगण्य असणारे डाळिंबाचे क्षेत्र वाढत असल्याचे चित्र आहे.

नावंदर यांच्या बागेतील एका डाळिंबाचे वजन दोनशे ते चारशे ग्रॅम असून कोणत्याच विकारांचा प्रादुर्भाव नसल्याने विदेशात पाठविण्यासाठी ते सक्षम ठरले आहे.

पाण्याच्या समस्येवर मात
नावंदर यांची गंगापूर शहरापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर अंबेवाडी शिवारात शेत जमीन आहे. शेतीसाठी या ठिकाणी पाण्याचे तसे दुर्भिक्षच आहे. नावंदर यांनी शेतात एकूण 74 बोअर घेतले. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. मुळात येथील जमिनीत पाणी जास्त काळ साठवून ठेवण्याची क्षमता नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तरीही ते निराश झाले नाहीत. साडेतीन किलोमीटर अंतरावर पाझर तलावाजवळील एका शेतकऱ्याची अर्धा एकर जमीन अकरा वर्षांच्या करारावर घेतली. त्या ठिकाणी मुबलक पाणी असल्याने बोअर घेतला व आपल्या शेतात तेथून जलवाहिनीद्वारे पाणी आणले. दरम्यान 75 लाख लिटर क्षमतेचे एक शेततळे खोदले व पाण्याची अडचण दूर केली. सध्या दीड कोटी लिटर क्षमतेचे आणखी एक सामूहिक शेततळे खोदले असून भविष्यात करावयाच्या असलेल्या फळ लागवडीसाठी त्याचा वापर होणार आहे. हे दोन्ही शेततळे मत्स्यपालनासाठी त्यांनी भाडेतत्त्वावर खासगी व्यक्तीला दिले आहेत. यातूनदेखील त्यांना उत्पन्न मिळत आहे.

फळबाग लागवडीसाठी केला अभ्यास
अडत व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी होणाऱ्या चर्चेतून फळबाग लागवडीसाठी प्रेरणा मिळाली. विशेषतः "सकाळ ऍग्रोवन'चे पहिल्या अंकापासून वाचक असल्याने यातून व इतर काही शेतीविषयक पुस्तके वाचून शास्त्रीय पद्धतीने लागवडीविषयी माहिती जमविली. कर्जत, श्रीगोंदा, नगर, सटाणा आदी ठिकाणच्या डाळिंब फळबागांना भेटी देऊन अभ्यास केला. सुरवातीला दोन हेक्‍टर डाळिंब फळबाग लागवड करण्याचा निश्‍चय केला. कर्जत तालुक्‍यातील देशमुखवाडीतील एका रोपवाटिकेतून भगवा या जातीची डाळिंबाची रोपे आणली. ऑगस्ट 2008 मध्ये दहा बाय दहा फूट अंतरावर दोन हेक्‍टर क्षेत्रात त्यांची लागवड केली.

डाळिंब लागवडीपूर्वी त्यांनी 13 एकरांत आंबा व मोसंबी फळबाग लावली. 2009-10 मध्ये 11 लाख 30 हजारांचे उत्पन्न त्यांना अंजीर विक्रीतून मिळाले. त्यांच्या अंजीर उत्पादनाला औरंगाबाद येथे झालेल्या महाऍग्रो प्रदर्शनात राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला.

सेंद्रिय शेतीचे प्रयोग
फळझाडे लागवडीपूर्वी मातीपरीक्षण करण्यात आले व आवश्‍यक खतांचे नियोजन केले. रासायनिक खतांचा गरजेनुसार वापर केलाच, मात्र सेंद्रिय खतामुळे खर्चात बचत होऊन जमिनीचा पोत सुधारला. गांडूळ खत तयार करण्यासाठी शेतवस्तीवर पत्र्याचे शेड बांधून सहा बेड तयार केले. सोबतच निंबोळी पेंडचा वापरदेखील केला. विशेष म्हणजे पाच रुपये लिटर या दराने गोमूत्र विकत आणून झाडांवर त्याची फवारणी केली.

वेळच्या वेळी निगा राखली
चौदाव्या महिन्यात झाडांना हस्त बहार घेतला. फळ परिपक्व होण्यासाठी साधारणतः पाच-सहा महिन्यांचा कालावधी लागला.
फळ खराब होण्यास कारणीभूत असणाऱ्या फळावर येणाऱ्या फांदीवरील काटे काढून टाकले. निम्या टाडे हा रोग रोखण्यासाठी गोमूत्राचा वापर प्रभावी ठरला.
भविष्यात स्वतः निर्यात करणार
विदेशात माल पाठविण्यासाठी आवश्‍यक असणारे ग्लोबल गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी श्री नावंदर हे पुणे येथील पणन महामंडळाकडे प्रस्ताव पाठविणार आहेत. डाळिंबाचे आणखी दहा एक क्षेत्र त्यांनी वाढविले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगातून प्रेरणा घेऊन आसपासचे शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळाले आहेत. त्यात प्रामुख्याने दिलीप पचपेंड (साडेसहा एकर), राजू सोमाणी (पाच एकर), लक्ष्मण पानकडे (चार एकर) साईनाथ कबाडे (चार एकर) आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

निर्यात करण्यासाठी नावंदर आपल्या बागेतील फळांसाठी वेगळा ब्रॅण्ड निर्माण करणार आहेत. यासाठी शेतावरच पॅकिंग प्रक्रिया उद्योग उभारणी करणार आहेत. सोबतच "बाय प्रॉडक्‍ट'देखील बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या फळबागेतून सध्या 50 मजुरांना कायमचा रोजगार मिळाला आहे.

तालुक्‍यातील डाळिंब क्षेत्र
सद्यःस्थितीत तालुक्‍यात सतरा हेक्‍टर क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आहे. यापैकी नऊ हेक्‍टर उत्पादित क्षेत्र आहे. सात वर्षांपूर्वी तालुक्‍यात पखोरा शिवारात अजित सीड्‌सने 15 एकर डाळिंब लागवड केली होती. लिंबेजळगाव येथील विनायक पाथ्रीकर यांनी देखील डाळिंब लागवड केली. यानंतर सर्वच गोष्टींचा अभ्यास करून महेश नावंदर यांनी केलेली डाळिंब लागवड यशस्वी ठरल्याने तालुक्‍यातील डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. डाळिंब रोपांसाठी कृषी विभागाकडून शंभर टक्के अनुदान देण्यात येते. त्यानंतर ठिबकसाठी देखील अनुदान दिले जाते. शेततळ्याची गरज असल्यास त्यासाठी देखील अनुदान उपलब्ध आहे.

गणित खर्च व उत्पन्नाचे (पाच एकरासाठी
रोपांसाठी खड्डे खोदणे, आखणी करणे व बुजविणे यासाठीचा खर्च-
28 हजार रुपये
लागवड करणे, खत टाकणे, छाटणी करणे, तोडणी व विरळणी, आच्छादन करणे व इतर यासाठीची मजुरी- एक लाख 12 हजार पाचशे रुपये
तण नियंत्रण, खते कीटकनाशक फवारणी औषधी- दोन लाख 80 हजार रुपये
ठिबक सिंचनासाठी एकरी वीस हजार या प्रमाणे पाच एकरासाठी- एक लाख रुपये
सर्व खर्च लागवड ते विक्रीपर्यंतचा अर्थात दोन वर्षांचा आहे.

उत्पन्न
निर्यातदाराला साडेचार टन डाळिंबाची विक्री पाच लाख रुपयांत केली
दुय्यम प्रतीचा माल स्थानिक बाजारपेठेत विकला. यातून साडेपाच लाखांचे उत्पन्न मिळाले.
(यापुढे लागवड काळातील खर्च कमी होऊन उत्पन्न वाढणार)

प्रतिक्रिया
डाळिंबाच्या शेतीसाठी हलकी व मध्यम स्वरूपाची जमीन आवश्‍यक असते ती या परिसरात आहे. तेल्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव या भागात अत्यल्प होत असल्याने डाळिंबाची शेती फायद्याची आहे.
- श्री. खर्डे (उपविभागीय कृषी अधिकारी)

शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून शेतीत त्याचा वापर करावा. विशेषतः फळबागेची शेती ही काळाची गरज आहे.
- महेश नावंदर

डाळिंब लागवडीतून कमी श्रमात, कमी क्षेत्रात जास्तीचे उत्पन्न घेता येते. तेव्हा आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी चांगला पर्याय आहे.
- एस. एम. पेंडभाजे, तालुका कृषी अधिकारी
प्रतिक्रिया
On 16/10/2011 10:47 PM mayur tayde said:
मला भारी क्याला जमिनी मध्ये डाळींबचे भरगोस उत्ब्दन घेता यीअल का ? कृपया मला त्या बद्दल माहिती द्यावी .
On 03/10/2011 03:03 PM Namdeo Zalte said:
डाळिंब लागवडीची माहिती हवी आहे
On 29/09/2011 08:39 AM Rakesh ahire said:
thank you , ple. detail information of pomegranate deasiges. important " TELYA"
On 14/09/2011 05:46 PM Babasaheb Wakle said:
कृपया मला अधिक लाग्वादिविषये माहिती द्या
On 9/4/2010 2:36 PM Parag Ghule said:
I AM N AGRI. Graduate & want to do Plantation of Pomegranate in my Farm So please guide me for taking Care of that


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: