कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीला वेग
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:45 AM (IST)
मुंबई - अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची आज बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या व मुंबई विभागीय कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पदांसाठी पक्षात मोठी चुरस आहे. त्यामुळे पक्षांतर्गत हालचालींनाही वेग आला आहे.
पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रमानुसार आज सोनिया गांधी यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. उद्यापासून प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू होतील. या दोन्ही पदांच्या निवडणुकीचा उद्या किंवा परवा कार्यक्रम जाहीर होईल, अशी शक्यता आहे. 12 व 13 सप्टेंबर या दरम्यान अर्ज भरण्याची मुदत राहील; मात्र निवडणूक टाळून सोनियांना अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार देण्याचा एक ओळीचा ठराव केला जाण्याची अधिक शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्षपदासाठी पक्षात विविध गट सक्रिय झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पदांसाठी अनेक नावे पुढे येत आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे पुन्हा आपली या पदावर वर्णी लागण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण व महसूलमंत्री नारायण राणे यांचे त्यांना समर्थन असल्याचे बोलले जाते. दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे समर्थकही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यात कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार जयवंत आवळे, विलास मुत्तेमवार, उल्हास पवार आदींचा समावेश आहे. केवळ वनमंत्रिपद मिळाल्याने नाराज असलेले पतंगराव कदमही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या पदासाठी अल्पसंख्याक व मागासर्गीय नेत्याचा विचार झाला, तर आमदार हुसेन दलवाई व शरद रणपिसे यांच्याही नावाची चर्चा आहे.
मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात माजी अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांचा गट आक्रमक झाला आहे. कामत गटाकडून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे नाव जोरदार पुढे आणले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी अध्यक्ष असावा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गटातून आमदार भाई जगताप यांचे नाव पुढे केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर विविध गटांमधील लढतीचे बरेचसे चित्र स्पष्ट होईल आणि आताची समीकरणे कदाचित उलटसुलट होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
माणिकरावांकडून सोनियांचे अभिनंदन
बिनविरोध निवडीबद्दल सोनिया गांधी यांचे माणिकरावांनी अभिनंदन केले आहे. देशातील तमाम कॉंग्रेसजनांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांचे नेतृत्व सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस आणि देशाचा विकास होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.