धुळे "सिव्हिल'मध्ये 22 लाखांचा गैरप्रकार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 01:30 AM (IST)
धुळे - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात "पर्सनल लेजर अकाऊंट' (पीएलए) निधीत काही वर्षांत सुमारे 22 लाखांचा गैरप्रकार झाल्याने शासनाने स्वतंत्रपणे चौकशी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. दरम्यान, रुग्णालयात आज केसपेपर काढण्यासाठी शुल्क भरूनही पावती मिळत नसल्याची, प्रसंगी अधिक पैसे मोजावे लागत असल्याची तक्रार काही रुग्णांनी शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांकडे केली. त्यानंतर रुग्णांच्या साहाय्याने शिवसेनेने संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
रुग्णालयात शिवसेनेचे आंदोलन सुरू असताना काही अंतरावर असलेल्या बाह्यरुग्ण केसपेपर कक्षात आज रूग्णांसह नातेवाइकांची गर्दी होती. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातील कामकाज, यंत्रसामग्रीत सुधारणा होण्यासाठी आंदोलन सुरू असतानाही रुग्णालयातील काही कर्मचारी किती निर्ढावलेले आहेत, हे व्यवस्थापनाने पाहावे, असे आंदोलकांनी स्पष्ट केले.
22 लाखांची चौकशी
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या काही वर्षात संकलित झालेल्या "पीएलए' फंडमधील सुमारे 22 लाखांच्या निधीचा विनियोग अन्यत्र झाल्याचे समजल्यानंतर राज्य शासनाने स्वतंत्रपणे नुकतीच चौकशी सुरू केली आहे. यात निधीचा गैरप्रकार कसा झाला, निधी कुठे व कुणाच्या परवानगीने वापरला गेला, त्यास दोषी कोण, यासह विविध प्रश्नांची उकल चौकशी झाल्यावर होणार आहे. ही चौकशी सुरू असल्याचे हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांनी "सकाळ'ला सांगितले. "पीएलए' फंडमधील निधी हा रुग्णांकडून भरल्या जाणाऱ्या विविध सेवा शुल्कातून संकलित होत असतो.
शहर पोलिसांत गुन्हा
आज सकाळी काही रुग्णांना अधिक पैसे घेऊन केसपेपर दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका रुग्णाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर उलगडा झाला. त्यावेळी केस- पेपर वाटप करणारा कर्मचारी आणि रुग्णांमध्ये वाद झाला. काही रुग्ण शिवसेना आंदोलकांकडे गेले. केसपेपर वाटप खिडकीतून पाच रुपयांऐवजी सात रुपये जास्त घेण्यात येत असल्याची तक्रार केशव भदाणे, जमील अन्सारी, वत्सलाबाई शिरोडे, जमील महम्मद, किशोर भदाणे आदी रुग्णांनी केली. जास्त पैसे घेण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच एका रुग्णाने विचारणा केली. त्यावरून वाद रंगला. रूग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनी केसपेपर वाटप कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी रुग्णांना पैसे दिल्याची पावती देण्यात येत नसल्याचेही काही रुग्णांनी सांगितले. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यांच्या मदतीने किशोर देविदास पाटील (रा. शिंदखेडा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी कर्मचाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक परदेशी तपास करीत आहेत.
शिवसेनेची मागणी
आंदोलनकर्त्यांनी सांगितले, की रुग्णालयातील केसपेपर वाटप खिडकीत रुग्णांना पाच रुपयांची नोंदणी पावती दिली जात नव्हती. त्यामुळे 25 ते 30 रुग्णांना पैसे भरल्याची पावती न देता केवळ केसपेपर दिला गेला. त्यामुळे "ती' रक्कम कर्मचाऱ्यांनी परस्पर हडप करण्याचा प्रयत्न केला. संबंधित कर्मचाऱ्यांची नावे अद्याप त्याचे नाव समजू शकलेली नाही. रुग्णालयात दुपारी बारानंतर रुग्ण आल्यास त्यांना अपघात विभागात तपासणीसाठी पाठविण्यात येते. तेथेही केसपेपर वाटप करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून अरेरावी करण्यात येते. याबाबतही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.