विद्यार्थी सेनेने काढली आरोग्यमंत्र्यांची प्रतीकात्मक शवयात्रा
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:00 AM (IST)
नागपूर - गरिबांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेचा विश्वास मेडिकलने गमावला आहे. येथील आरोग्य सेवेत व्यावसायिकता आली. औषधांचा तुटवडा पसरला, सर्जिकल साहित्य विक्रीत गैरव्यवहार होत असून येथील डॉक्टरांचेच खासगी दवाखाने आहेत. यामुळे मेडिकलमधील आरोग्य सेवा विस्कळित केली असल्याचा आरोप करीत शिवसेनाप्रणीत भारतीय विद्यार्थी सेनेने मेडिकल परिसरात आरोग्यमंत्र्यांची प्रतीकात्मक शवयात्रा काढली, पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून निषेध व्यक्त केला.
मेडिकल परिसरातून रुग्ण पळविण्याचे कारस्थान मोठ्या प्रमाणात होत असताना येथील प्रशासन मात्र मूग गिळून आहे. मृतदेह नेण्यासाठी मेडिकलमध्ये शववाहिका असावी, ती सोय उपलब्ध करून द्यावी, परंतु या परिसरात खासगी वाहनचालकांचा हैदोस पसरला असतो. मृतांच्या नातेवाइकांचे येथे भावनिक शोषण होत असल्याचा आरोप शहरप्रमुख प्रवीण शर्मा यांनी केला. मेडिकलमध्ये असलेले सर्वच स्वच्छतागृहे बंद ठेवण्यात येत असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांकडून येथे अस्वच्छता पसरवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. मेडिकलमध्ये औषधसाठा उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीचे निवेदन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना दिले. निदर्शने आंदोलनात प्रवीण शर्मा, डॉ. माया दुबे, बहादूर कलसे, नीरज राघवानी, गायत्री सोलंकी, संजय गुप्ता, अमर नगरारे, सचिन सोनारक, बबलू सरदार, राजेश शनकत, विजय थामस, अंकित धुपे, नरेश गुर्जर, स्वप्नील बागडे, संतोष डागरे, मोरेश पीटर, सागर चौहान, अर्जुन वाघाडे, राहुल चांडक यांच्यासहित शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.