खड्ड्यांवरून पालिका प्रशासनाचे वाभाडे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:47 AM (IST)
मुंबई - धुवाधार पावसाने मुंबईतील रस्त्यांची दाणादाण उडविली आहे. रस्त्यातील खड्डे वाढू लागले असून वाहतुकीला त्याचा अडथळा होत आहे. बहुतांश रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्याचे तीव्र पडसाद आज पालिकेच्या सभागृहात उमटले. कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्ते दुरुस्त होत नसल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी आज प्रशासनाचे वाभाडे काढले. पावसाची उघडीप मिळताच रस्त्यांची दुरुस्ती झपाट्याने करून गणेशोत्सवापूर्वी मुंबई खड्डेमुक्त करू, अशी ग्वाही प्रशासनाने दिली.
पालिका दर वर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करते; परंतु रस्त्यांची सुधारणा होत नाही. मुंबईकरांना दर वर्षी या त्रासाशी सामना करावा लागतो. प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले तरीही त्रास संपलेला नाही. त्याबाबत कठोर उपाययोजना करा, अशी मागणी करणाऱ्या ठरावाची सूचना कॉंग्रेसचे विनोद शेखर यांनी आज पालिका सभागृहात मांडली होती. गणेशोत्सव तोंडावर असल्यामुळे या मुद्द्यावर सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना "ब्लॅकलिस्ट' का केले जात नाही, असा सवाल केला. कंत्राटदारांच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे, "मॅनहोल्स' उघडे आहेत, खड्ड्यांनी रस्ते व्यापले आहेत, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. विभागात रस्त्यांची कामेच केली नसल्याने संतप्त झालेल्या कॉंग्रेसच्या नगरसेविका गीता यादव यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. "व्हीआयपी' रोड सोडले, तर इतर रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. अशा वेळी दक्षता खाते करते काय, असा सवाल भाजपचे योगेश सागर यांनी केला. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त वातानुकूलित कार्यालयातून बाहेर पडत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. "एमएमआरडीए'च्या कामांमुळे रस्त्यांची अवस्था वाईट झाल्याकडे शिवसेनेचे यशोधर फणसे यांनी लक्ष वेधले. अजित रावराणे, रफिक शेख आदी सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली.
स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे म्हणाले की, दर वर्षी 150 किलोमीटर इतक्या लांबीच्या रस्त्याची काम केली जातात. रस्त्यांच्या कामासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांकडून पालिकेच्या अभियंत्यांना रस्ते दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल डिग्गीकर यांनी मान्य केले. मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी "कार्बन कोर' या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो; परंतु पावसात या तंत्रज्ञानाने बुजविलेले खड्डे टिकत नाहीत. त्यासाठी पावसाची उघडीप हवी; मात्र गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.