स्मशानभूमीत स्लॅब कोसळून चार ठार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:15 AM (IST)
रामटेक - अंत्यसंस्कार सुरू असताना स्मशानभूमीमधील निवाऱ्यात बसलेल्या चौघांचा स्लॅब कोसळल्यामुळे दबून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. अमोल वांढरे, रूपेश सावरकर, रवींद्र आकरे आणि मंगेश कडू अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे रामटेक तालुक्यातील मानापूर गावावर शोककळा पसरली आहे.
मानापूर येथील अजाबराव वांढरे (वय 82) यांचे शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास निधन झाले. मानापूर गावाजवळ स्मशानभूमी आहे. मात्र, सर्वत्र पाणी साचल्यामुळे आत जाणे शक्य नसल्याने त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रामटेक येथील अंबाळा स्मशानभूमीत आणण्यात आला. अंत्यसंस्कार सुरू असताना पंधरा ते वीस परिचित आणि नातेवाईक स्मशानभूमीतील पक्क्या निवाऱ्याच्या आडोशाला बसले होते. अजाबराव यांचा नातू अमोल दामोधर वांढरे, रूपेश रामलाल सावरकर, रवींद्र मुरलीधर आकरे तिघेही (रा. मानापूर) आणि मंगेश अंकुशराव कडू (रा. पिपळा-हुडकेश्वर) हेही तेथे बसले होते. याच वेळी मिनीडोर (मॅक्स, क्र.- एमएच 40, 448) मागे घेत असताना त्या निवाऱ्याच्या विटांच्या कॉलमला धक्का बसला. धक्का लागताच हा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळत असल्याचे बघून काहींना लगेच ओढण्यात आले, तर काही जणांनी सुरक्षित ठिकाण गाठले. मात्र, अमोल दामोधर वांढरे, रूपेश रामलाल सावरकर, रवींद्र मुरलीधर आकरे आणि मंगेश अंकुशराव कडू यांचा त्याखाली दबून करुण अंत झाला.
जेसीबीच्या मदतीने मलबा दूर करून या चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या निवाऱ्याचे बांधकाम अंदाजे 25 वर्षे जुने असून, विटांच्या कॉलमवर स्लॅब टाकण्यात आला होता. या कॉलमला मिनीडोरचा धक्का बसताच स्लॅब कोसळला. मृतकामधील रवींद्र आकरे हे ग्रामपंचायत निवडणुकीत नुकतेच निवडून आले होते. पानटपरीचा व्यवसाय असलेल्या रवींद्र यांच्या विजयाबद्दल दहा दिवसांपूर्वी जल्लोष साजरा करण्यात आला होता. अचानक झालेल्या या आघातामुळे शंभर घरांचे मानापूर गाव हादरले आहे. गावामध्ये मृतांच्या नातेवाइकांचा एकच आक्रोश सुरू आहे. घटनेनंतर मिनीडोरचालक पळून गेला आहे.
घटनेची माहिती मिळताच रामटेक आणि मानापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णराव आदेवार, ठाणेदार यादवराव राठोड यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
चार वर्षांपूर्वी "सकाळ'ने मांडली होती समस्या
चार वर्षांपूर्वी "सकाळ'ने "सरणावरच्या यातना' या सदराखाली "मृतदेहालाही अडविणारा मानापूर नाला' या शीर्षकाखाली मानापूरच्या स्मशानभूमीची समस्या मांडली होती. मात्र, उदासीन लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तसेच कुणीही पाठपुरावा न केल्यामुळे स्मशानभूमीच्या रस्त्यावर साधा रपटाही बांधण्यात आलेला नाही. त्याचा साधा प्रस्तावही तयार झालेला नाही. गावातील स्मशानभूमी चांगली असती तर पुढील अनर्थ टळला असता, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.