दरोड्याच्या प्रयत्नासह चोरीच्या गुन्ह्यांची होमगार्डची कबुली
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:00 AM (IST)
अकोला - लुटमारप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकलेल्या होमगार्डने शुक्रवारी (ता. तीन) बोरगावमंजू येथील भारतीय स्टेट बॅंकेवरील दरोड्याच्या प्रयत्नासह चोरीच्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली.
शस्त्राच्या धाकावर लुटल्याप्रकरणी बोरगावमंजू येथील सिद्धार्थ भीमराव तायडे (वय 26) व त्याचा सहकारी संदेश सुरेश खंडारे (वय 24) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. दोन) अटक केली. होमगार्ड असलेला सिद्धार्थ गुन्हा केल्यानंतर पोलिस ठाण्यात जात पोलिस कारवाईबाबत माहिती घेत होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्यामार्फत त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे कळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चौकशीत शिक्षकाला लुटण्यासोबतच बोरगावमंजू येथील भारतीय स्टेट बॅंक शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची कबुली त्याने दिली. बॅंक फोडण्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडी सब्बलही जप्त पोलिसांनी जप्त केला. बोरगावमंजू बसस्थानकावर उभ्या दोन वाहनातून बॅटरी चोरीची कबुली देणाऱ्या या दोघांकडून सहा हजारांच्या बॅटऱ्यादेखील जप्त झाल्या.