"थर'थराट महागात पडला
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:49 AM (IST)
मुंबई - हंड्या फोडण्यासाठी मंडळांमध्ये चुरस वाढविण्याच्या नादात थरावर थर वाढविण्याचा आयोजकांचा अट्टहास यंदा चांगलाच महागात पडला आहे. थरावरून कोसळून तब्बल चारशेहून अधिक गोविंदा जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंड्या फोडताना यंदा जखमींच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष वर्षानुवर्षे वाढतच असला तरी लाखांच्या बक्षिसांचे आमिष दाखवून जिवाशी खेळण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. मागील वर्षापर्यंत नऊ थरांची हंडी फोडण्याचा विक्रम होता. यंदा आयोजकांनी दहाव्या थरापर्यंत हंडी नेऊन पाहणाऱ्यांसाठी "थर'थराट निर्माण केला; मात्र प्रत्यक्षात हंड्या फोडणाऱ्या मंडळांना हा थरथराट मोठ्या जोखिमेचा ठरला आहे. गेल्या वर्षी थरावरून पडून 75 ते 100 गोविंदा जखमी झाले होते. यंदा 421 जण जखमी झाले आहेत. केईएममध्ये दत्तात्रय साळुंखे (30), शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात गणेश देठे (25) व दीपक मोरे (25) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
हातापायांना मुका मार
गोविंदांना विम्याचे संरक्षण मिळाले असले, तरी हातापायांना मुका मार बसणे आणि डोक्याला गंभीर जखमा होऊन अनेकांना जायबंदी होणे चुकलेले नाही. पालिकेच्या विविध रुग्णालयांमधून 271 गोविंदांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले असून 50 जणांना भरती करून घेण्यात आले आहे. दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांची विचारपूस केली. जखमींच्या उपचारात कोणतीही हयगय होऊ नये, अशा सूचना त्यांनी पालिकेच्या रुग्णालयांना दिल्या आहेत.
रुग्णालयात दाखल गोविंदा
केईएम - 21
नायर - 2
शीव - 12
राजावाडी - 4
अग्रवाल - 1
भगवती - 3
कूपर - 3
व्ही. एन. देसाई - 2
जे. जे. - 1
------------------
एकूण - 50