आर्णीत पुजाऱ्यासह तिघांचा खून, एक गंभीर
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:30 AM (IST)
आर्णी (जि. यवतमाळ) - शहरालगतच्या अरुणावती नदीजवळ असलेल्या महादेव मंदिरातील वृद्ध पुजाऱ्यासह तिघांची हत्या करण्यात आली. ही घटना आज (ता. तीन) पहाटे चारच्या सुमारास घडली. एकाची प्रकृती गंभीर असून, त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. मृतकांमध्ये पुजारी मोतीराम गोविंदराव शिंदे महाराज (वय 75), आचारी रामोजी राघोजी मिरासे (वय 65) व राजेश प्रल्हाद इंगळे (वय 27), रा. आर्णी या तिघांचा तर जखमीमध्ये अनिल उमरे (वय 30) रा. उमरी पठार याचा समावेश आहे.
आर्णी येथे अरुणावती नदीच्या काठावर जागृत महादेवाचे मंदिर आहे. मंदिराजवळच आर्णीकरांचे श्रद्धास्थान असलेला बाबा कंबलपोष दर्गासुद्धा आहे. मंदिराच्या जवळच रेतीघाट असून, येथे रेतीसाठी सतत ट्रक-ट्रॅक्टरची वर्दळ असते. गुरुवारी (ता. दोन) रात्री रेतीसाठी तीन ट्रॅक्टर नदीच्या पात्रात आले होते. पण, त्यादरम्यान आर्णीतील काही नागरिकांनी त्यावर आक्षेप घेऊन तहसीलदार रवींद्र जोगी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे महसूल विभागाने तीनही ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली होती. नेमक्या त्याच रात्री हे हत्याकांड घडले, हे विशेष.
या मंदिरात मागील 15 दिवसांपूर्वीपासून मोतीराम शिंदे पुजारी म्हणून आले होते, तर त्याच रात्रीला येथील वॉर्ड क्रमांक एकमधील आचारी रामोजी मिराशे, राजेश इंगळे व अनिल उमरे रात्री मंदिरासमोरील शेडमध्ये झोपले होते. आज (ता. तीन) सकाळच्या सुमारास वॉर्ड क्रमांक पाचमधील श्री. डामरे यांच्याकडील विवाह सोहळा याच मंदिरात होता. नेहमीप्रमाणे पहाटे पाचच्या सुमारास पुष्पा किसन चव्हाण ही महिला मंदिराची साफसफाई करण्यासाठी आली असता मंदिरासमोर तिघेही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले आढळले. तेव्हा ती महिला घाबरून दर्ग्यासमोरील रस्त्याकडे आली. दरम्यान, बळीराम उदेभान मंदेवार हे गृहस्थ दर्शनासाठी येत असताना त्या महिलेने मंदिरातील घटना त्यांना सांगितली. त्यादरम्यान आर्णी पोलिस ठाण्याचे गोपनीय शाखेचे चंदन हे पहाटे गस्तीसाठी फिरत असताना त्यांना ही घटना संबंधित गृहस्थाने सांगितली. ही माहिती मिळताच पोलिस पथकाने मंदिर गाठले. तेथे पुजारी शिंदे महाराज, आचारी रामोजी मिरासे व राजेश इंगळे हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले, तर अनिल उमरे हा जखमी अवस्थेत तडफडत होता.
घटनास्थळी मारेकऱ्यांनी वापरलेल्या लाकडाच्या झिलप्या व रक्ताचा सडा पडून होता. ही घटना सकाळी सहाच्या सुमारास आर्णी शहरात पसरताच अनेकांनी मंदिराकडे धाव घेतली. या घटनेचा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच बाजारपेठ व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आवाहन केले. आर्णीतील तणाव वाढत असतानाच पोलिस अधीक्षक डॉ. सुरेश मेखला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध अढाऊ व राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी शहरात दाखल झाली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनासुद्धा यावेळी पाचारण करण्यात आले होते. परंतु, श्वानपथकातील "रूबी'ने फारसा प्रतिसाद दिला नाही. अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाच्या मंदिरातील या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटना, भाविकांनीसुद्धा पोलिस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला.
मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांनी केली. तीन निष्पाप व निरपराधांना क्रूरतेने ठार मारल्यामुळे आर्णीतील वातावरण तापले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास पाटील, पोलिस निरीक्षक बाबूराव खंदारे, आर्णीचे ठाणेदार गिरीश बोबडे, श्वानपथकाचे पोलिस उपनिरीक्षक आर. एम. भुरे, ठसेतज्ज्ञ भास्कर बोरडे यांनी ठसे घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार संजय राठोड यांनीसुद्धा घटनास्थळाला भेट देऊन मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. या घटनेचा तपास चौफेर पद्धतीने करून मारेकऱ्यांना त्वरित अटक करू, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. सुरेश मेखला यांनी उपस्थितांना दिली.
नागरिकांनी शांतता, सुव्यवस्था राखावी
विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दलबीरसिंग भारती यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपींना त्वरित अटक करू, नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. क्रूरतेने ठार करणाऱ्या आरोपींना कधीच माफ केले जाणार नाही, आम्हाला तपास करण्यासाठी थोडा वेळ द्या, असे आवाहन डॉ. दलबीरसिंग भारती यांनी केले.