पिंपरी - एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आपल्या मामेबहिणीचा चाकूने भोसकून खून केला. तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीवरही त्याने वार केले. नंतर स्वतःवर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आकुर्डी रेल्वे स्थानकानजीक वाल्हेकरवाडी येथे आज सकाळी ही घटना घडली. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच ज्योत्स्नाचा बळी गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योत्स्ना कारभारी बागूल (वय 20, रा. सोनपाल बंगला, गुरुद्वारानजीक आकुर्डी, मूळगाव हरसूल, नाशिक) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिची मैत्रीण साधना जगन्नाथ गोडसे (वय 21, रा. सेंट फ्रान्सिस कॉलनी, भांडूप, मुंबई) आणि आतेभाऊ योगेश रामदास बच्छाव (वय 27, रा. तळेगाव दाभाडे, मूळगाव डिंगाळे, ता. सटाणा, जि. नाशिक) जखमी झाले आहेत.
ज्योत्स्ना व साधना आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी असून, योगेश हा तळेगाव दाभाडे येथे जनरल मोटार्स कंपनीत नोकरीस आहे. त्याचे शिक्षण "आयटीआय'पर्यंत झाले आहे. ज्योत्स्नावर त्याचे एकतर्फी प्रेम होते. त्यातून त्याने शुक्रवारी (ता. 3) सकाळी सव्वाआठच्या सुमारास आकुर्डी येथे गुरुद्वारानजीक भररस्त्यात ज्योत्स्नावर हल्ला केला. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिची मैत्रीण साधनावर चिंचवडमधील (बिजलीनगर), तर योगेशवर निगडीतील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
ज्योत्स्नाची दुचाकी, सॅक, योगेशची दुचाकी, चाकू, कोयता, आणखी एक सॅक व प्रकाश विक्रम गोलांडे (वय 22, रा. समर्थनगर, भूम, उस्मानाबाद) या विद्यार्थ्याचे महाविद्यालयीन ओळखपत्र पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहे. याच महाविद्यालयातील विद्यार्थी केदार बिरादार याने एका रिक्षाचालकाच्या मदतीने साधनाला, तर पोलिसांनी योगेशला रुग्णालयात दाखल केले. प्रत्यक्षदर्शी कोणीही घटनास्थळाजवळ थांबले नाहीत. परिसरातील खाणावळ चालक, तेथील चार-पाच घरातील नागरिकही घरांना कुलूप लावून पसार झाले आहेत. साधना व योगेश यांच्या जबाबावरूनच घटनेचे कारण उलगडले. ज्योत्स्ना आणि साधना एकाच वर्गात व एकाच सदनिकेत कॉटबेसीसवर राहत होत्या. आकुर्डीत डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट क्लासरूम जवळील खासगी खाणावळीतून साधना जेवणाचा डबा घेत असे. नेहमीप्रमाणे दोघी सकाळी ज्योत्स्नाच्या मोपेडवरून खाणावळीत आल्या. ज्योत्स्ना मोपेडवर बसून होती. साधना डबा आणण्यासाठी गेली. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या योगेशने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले व पोटात तीन ठिकाणी भोसकले. हा प्रकार बघताच धावत येऊन साधनाने ज्योत्स्नाला वाचविण्याचा प्रयत्न केला. योगेशने तिच्यावरही वार केले. नंतर स्वतःवर वार केले. साधनाच्या डाव्या पायावर जखमा झाल्या आहेत.
श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची तपासणी केली. अतिरिक्त आयुक्त संजय लाठकर, सहायक आयुक्त सुधीर चौगुले, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून साधना व योगेशची भेट घेतली.
अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय लाठकर म्हणाले, ""योगेश बच्छावचे त्याची मामेबहीण ज्योत्स्ना बागूल हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तिला त्याने लग्नाची मागणी घातली होती. तिचे आपल्याशी लग्न लावून द्यावे यासाठी ज्योत्स्ना व तिच्या आई-वडिलांना योगेश नेहमीच धमकी देत होता.''
ज्योत्स्नाचे वडील तिचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत. ते व अन्य नातेवाईक दुपारी नाशिकहून चिंचवडमध्ये आले. त्यांनी योगेशविरुद्ध चिंचवड (पुणे) व अंबड (नाशिक) पोलिसांकडे तक्रार दिली होती. कोणीही त्यांची दखल घेतली नाही. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे ज्योत्स्नाचा बळी गेल्याचा आरोप त्यांनी केला. मोबाईलवर एसएमएस करून प्रसंगी दूरध्वनीवरून योगेश ज्योत्स्नासह तिच्या पालकांना धमकावीत होता. एक सप्टेंबर रोजी तिने चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला होता. शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी ती पोलिसांना भेटणार असल्याचे तिने आईला दूरध्वनीवरून सांगितले होते.
हवालदार निलंबित, दोघांची बदली
ज्योत्स्ना बागूलच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या चिंचवड पोलिस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांची शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच हवालदार संजय सरकाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र सावंत आणि सहायक निरीक्षक विश्वास जाचक यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, सहायक आयुक्त सुधीर चौगुले यांच्यामार्फत त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केल्याचे पोलिस उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले.