"खरा' गुणवंत शिक्षक पुरस्कारापासून दूरच
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:15 AM (IST)
जळगाव - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस (5 सप्टेंबर) हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना तालुकावार गुणवंत शिक्षक पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे निकष असले तरी केवळ फाईलमध्ये असलेल्या माहितीच्या आधारावर पुरस्कार असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाने केलेले प्रयत्न, गुणवत्तावाढीसाठी नेमके केलेले कार्य याचे मूल्यमापन पुरस्कार जाहीर करताना केले जात नाही. त्यामुळे हा पुरस्कार केवळ फायलीतील माहितीच्या आधारेच दिला जात असल्याची प्रतिक्रिया पुरस्कारास पात्र असलेल्या मात्र पुरस्कार न मिळालेल्या शिक्षकांची आहे.
शिक्षकाने शाळेच्या चार भिंतीआतील केलेल्या कार्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे असतात. विद्यार्थी चांगला शिकला तर तो पुढे जातो. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगले शिकविले जात नसल्याचे चित्र आहे. गुणवत्तेचा विकास पाहिल्यास शाळेतील विद्यार्थ्यास त्याचे नाव काय, इंग्रजीतील चार शब्दही निटसे बोलता येत नाही.
एकीकडे खासगी शिक्षण संस्थेच्या माध्यमात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना रांगेत उभे राहावे लागते; तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना भटकंती करावी लागते. हे चित्र बदलण्यासाठी किती गुणवंत शिक्षकांनी प्रयत्न केले हा संशोधनाचा विषय आहे.
गुणवंत शिक्षक पुरस्काराची प्रक्रियाच ऑगस्टमध्ये सुरू होते. पाच सप्टेंबरच्या आत ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. जो शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवितो, त्याचाच पुरस्कारासाठी विचार केला जातो. जो प्रस्ताव पाठवित नाही, त्याचा विचार केला जात नाही. मग त्याने पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षकापेक्षा कितीही अधिक चांगले काम का केले असेना, ही शोकांतिका आहे. खासगी शाळांतील संस्था शिक्षक पुरस्कार देताना कोणतेही प्रस्ताव पाठवीत नाही. मात्र ज्याने खरे चांगले कार्य केले आहे, जनमानसात त्याला शिक्षक म्हणून मानाचे स्थान आहे, अशांची निवड केली जाते. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी खऱ्या गुणवंतांचा शोध घेऊन पुरस्कार देण्याची गरज आहे. जिल्ह्यात असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी केली; मात्र पुरस्कारासाठी प्रस्ताव मिळविलेला नाही.