अमेरिकी अधिकाऱ्याकडून माहिती कायद्याचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:34 AM (IST)
मुंबई - माहितीच्या अधिकाराचा कायदा जगासाठी मार्गदर्शक आहे, असे मत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे प्रमुख माहिती अधिकारी विवेक कुंद्रा यांनी आज येथे व्यक्त केले; पण त्याच वेळी देशाच्या हिताच्या दृष्टीने संवेदनशील असलेली माहिती सुरक्षित ठेवली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. "अमेरिकन सेंटर'मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सरकारी कारभाराची माहिती लोकांना उपलब्ध व्हावी, लोकांची त्यावर नजर असावी यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
पारदर्शक कारभार आणि त्यावर जनतेची नजर असणे यासाठी माहितीचा अधिकार कायदा हा जगाला मागदर्शन करणारा आहे, असे कौतुक कुंद्रा यांनी केले. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेला "यूआयडी' प्रकल्प, सायबर सुरक्षेबाबत अमेरिकेला उत्सुकता असल्याचे कुंद्रा यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत अमेरिकन प्रशासनात गोपनीयता, अपारदर्शकता मोठ्या प्रमाणात होती; पण त्याऐवजी सरकारी कारभार, सरकारी उपक्रमांचा कारभार हा पारदर्शक व खुला असावा यासाठी काम सुरू झाले आहे. आपल्या पैशांचा विनियोग सरकार वा सरकारी उपक्रम कशा रीतीने करत आहेत, हे जाणून घेण्याचा हक्क करदाते असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी माहिती मागण्यापूर्वीच ती उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे, असे कुंद्रा यांनी सांगितले.