Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन महिला जागीच ठार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:30 AM (IST)

हिंगोली - वसमत तालुक्‍यातील करंजाळा शिवारात विद्युत तार अंगावर पडून शेतात निंदणी करणाऱ्या दोन महिला जागीच ठार झाल्या, तर अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. तीन) सायंकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजाळा गावालगत एकनाथराव कदम यांच्या शेतात शुक्रवारी (ता. तीन) आठ ते दहा महिला कापसात निंदणीचे काम करीत होत्या. सांयकाळी साडेपाचच्या सुमारास करंजाळ्याहून तपोवन गावासाठी गेलेली उच्चदाब विद्युत वाहिनीची तार घर्षण होऊन अचानक तुटली. ही विद्युत तार शेतात काम करीत असलेल्या दैवशाला लिंबाजी सोनुने (वय 34), कान्होपात्रा दिलीप कदम (वय 30) यांच्या अंगावर पडली. यात विद्युत स्पर्श झाल्याने या दोन्ही महिला जागीच ठार झाल्या. हा प्रकार इतर महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्या शेतातून पळू लागल्या. यामध्ये वत्सलाबाई केशव गायकवाड (वय 45) व गजराबाई मुंजाजी कदम (वय 60) यांच्या पायालाही विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्या भाजल्या गेल्या.

या प्रकारामुळे आरडाओरड होताच गावकरी धावत घटनास्थळी आले. गावकरी बाबाराव कदम, गजानन खुटाफळे, अतुल कदम, बापू गायकवाड, संजय कदम आदींनी जखमी महिलांना तातडीने खासगी वाहनाने परभणी येथे उपचारासाठी हलवले. सायंकाळी उशीरा हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश शर्मा, जमादार राजू राठोड, जगदीपसिंह ठाकूर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकारामुळे गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. जखमींपैकी वत्सलाबाई गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: