कॉंग्रेस शहरअध्यक्ष पदाचा निर्णय लवकरच
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:30 AM (IST)
औरंगाबाद - कॉंग्रेस पक्षाच्या औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष पदावरील निवडीबाबतचा निर्णय लवकरच पक्षश्रेष्ठीकडून घेतला जाईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (ता. तीन) "सकाळ'शी बोलताना सांगितले.
राज्यातील बहुतांश शहरांच्या अध्यक्षाची निवडप्रक्रिया पूर्ण झालेली आहे. औरंगाबादमध्ये मात्र, स्थानिक नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे निवड लांबणीवर पडलेली आहे. मीर हिदायत अली व ऍड. सय्यद अक्रम या दोघांची नावे पक्षश्रेष्ठीकंडे पाठविण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी, माजीमंत्री शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत गेल्याच आठवड्यात घेण्यात आला. विद्यमान अध्यक्ष जी.एस.ए. अन्सारी हेही या पदाचे दावेदार आहेत. सध्या ते हज यात्रेसाठी गेलेले आहेत. शहरातील काही नेते सध्या मुंबईत तळ ठोकून बसले आहेत.
औरंगाबाद शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दोन जणांची नावे हायकमांडकडे पाठविण्यात आली आहेत. यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले जिथे एकमत होत नाही, तिथे हायकमांडकडे निर्णय पाठविण्याची पध्दत आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलाविलेल्या सभेत तसा ठराव त्यांनी घेतला आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.
शालेय शुल्क नियंत्रणासंदर्भात कायदा केला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल म्हटले होते.
यासंदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले, की शालेय शुल्क नियंत्रणासंदर्भात ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण खात्याने शुल्क निर्बंधासंदर्भातील प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविल्यास, त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून जरूर विचार केला जाईल. गरज पडल्यास परत सरकारची भूमिका उच्च न्यायालयात मांडायची झाल्यास ती मांडली जाईल.