काश्मीरप्रश्नावरील चर्चेत स्वातंत्र्याचा मुद्दा केंद्रस्थानी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:40 AM (IST)
मुंबई - काश्मीरप्रश्नी तोडग्यासाठी चर्चेची सुरुवात, "स्वतंत्र काश्मीर' या मुद्याला केंद्रस्थानी ठेवूनच होऊ शकते, अशी मल्लिनाथी काश्मिरी नेते व "पीपल्स कॉन्फरन्स'चे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी आज येथे केली; तसेच सध्या काश्मीरमध्ये धुमसत असलेला असंतोष आणि सुरू असलेले आंदोलन उत्स्फूर्त असल्याचा दावाही त्यांनी केला.
"काश्मीर ऍट क्रॉस रोड्स : द वे फॉरवर्ड' यावर आज प्रेस क्लबमध्ये चर्चासत्र झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लोन यांनी काश्मीर प्रश्नाच्या तोडग्याची चर्चा ही "स्वतंत्र काश्मीर'च्या मुद्याला बाजूला ठेवून होऊ शकत नाही. "स्वतंत्र काश्मीर' हीच काश्मिरी जनतेची मूलभूत इच्छा आहे. काश्मीरच्या नागरी भागातून भारत सरकारने लष्कर मागे घेतले तर बरे होईल, अशी मते व्यक्त केली.
आतापर्यंत केंद्र सरकारने नेहमी विश्वासघातच केला. दिलेली आश्वासने पाळली नाहीत, अशी काश्मिरी जनतेची भावना आहे; तसेच सुरक्षा दलांकडून आपल्या आईवडिलांचा, कुटुंबीयांचा छळ होत असल्याचेच गेल्या 20 वर्षांत जन्मलेल्या पिढीने पाहिले आहे. या मानहानीमुळे त्यांच्या मनात राग आहे. त्याचाच उद्रेक सध्या पाहायला मिळत आहे, असा दावाही लोन यांनी केला. काश्मिरी पंडितांना आपल्या भूमीतून जावे लागले ही दुर्दैवी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रियाही लोन यांनी एका प्रश्नावर व्यक्त केली.
गेल्या काही महिन्यांत काश्मीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात दहशतवादाशी काडीचाही संबंध नसलेले असे 80 आंदोलक मरण पावले आहेत. पोखरलेली व्यवस्था, सरकारने केलेला अन्याय याबाबत हे तरुण संताप व्यक्त करत आहेत. त्यासाठी त्यांनी हातात दगड उचलला आहे; पण केंद्र सरकार मात्र त्यांना गोळ्या घालून ठार मारत आहे, याबाबत काश्मिरी पत्रकार बशीर मन्झर यांनी खेद व्यक्त केला.
तत्पूर्वी काश्मीरप्रश्नावर झालेल्या चर्चासत्रात तेथील परिस्थितीवर सर्वंकष चर्चा झाली; तसेच नि:शस्त्र काश्मिरींच्या आंदोलनाविरोधात सुरू असलेला लष्करी बळाचा वापर तातडीने थांबवावा, विविध पक्षांना एकत्रित करून तातडीने चर्चा सुरू करावी, मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही, या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काश्मिरी जनतेला दिलेल्या शब्दाचे पालन व्हावे, काश्मीरच्या नागरी परिसरातून तातडीने लष्कर मागे घ्यावे, अशा मागण्या केंद्र सरकारकडे करणारा ठराव या वेळी करण्यात आला. त्यावर प्रा. पुष्पा भावे, जतीन देसाई, दीपक लोखंडे, मीना मेनन, सज्जाद लोन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.