Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

केवळ राजकारणावरच पोट चालत नाही
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 01:01 AM (IST)

मुंबई  -  केवळ राजकारणावरच पोट चालत नाही; तर व्यवसायही आवश्‍यकच आहे. शेवटी व्यवसायही इतरांना काहीतरी देण्यासाठीच चालत असतो, असे प्रतिपादन आमदार नितीन सरदेसाई यांनी आज येथे केले.

व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र व्यापारी पेठेचे उद्‌घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार नितीन सरदेसाई यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर या वेळी मित्र मंडळाचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, उपाध्यक्ष किशोर रांगणेकर, पेठेच्या आयोजक समितीचे अध्यक्ष अनंत भालेकर, कार्यवाह किशोर साठे व कार्याध्यक्ष विजय कामेरकर आदी उपस्थित होते; तर उपस्थितांमध्ये प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, "केसरी टुर्स'चे केसरी पाटील, तसेच अनेक मराठी उद्योजक, नगरसेवक प्रकाश पाटणकर आदी उपस्थित होते.

आमदार सरदेसाई म्हणाले, की व्यवसायात अतिमहत्त्वाकांक्षा ही नेहमीच वाईट असते; मात्र महत्त्वाकांक्षा असावीच. थोडेसे धाडस केल्याशिवाय व्यवसाय करता येत नाही. "आमची कोणतीही शाखा नाही', असे अभिमानाने सांगण्यापेक्षा "आमच्या देशभरात 50 शाखा आहेत', असे सांगणाऱ्या मराठी व्यावसायिकाचे पाय पकडायलाच मला आवडेल. व्यवसाय हा वाढविण्यासाठीच असतो. शेवटी रोजगार आदींच्या स्वरूपामुळे त्याचा लाभ इतरांनाच होत असतो. पैसा कमावणे हे वाईट मुळीच नाही; मात्र माणूस चांगल्या मार्गातून पैसा कमावून श्रीमंत झाला पाहिजे.

ज्योतिर्भास्कर साळगावकर यांनी या प्रसंगी सांगितले, की व्यवसाय क्षेत्रात एखादी अडचण आली, की आधी बुद्धी काम करेनाशी होते आणि मग भांडवलही नाहीसे होते. अडचणीच्या वेळी मराठी व्यावसायिकाने कसे वागायचे ते ठरवले पाहिजे. प्रसंगी इतर प्रांतीय कसे वागतात, याचेही अवलोकन करावे. त्याच्या इतर सहकाऱ्यांनी, नातेवाइकांनी अशा काळात त्या व्यावसायिकाला साथ द्यायला हवी. यंदाची व्यापारी पेठ नेहमीपेक्षा निराळी असून, तिची उलाढालही आधीच्या सात ते आठ कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

दादर (पश्‍चिम) येथील अँटोनिओ डिसिल्व्हा शाळेच्या पटांगणात 8 नोव्हेंबरपर्यंत ही व्यापारी पेठ सकाळी 10 ते रात्री 8.30 पर्यंत चालू असेल. सलग 22 व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या व्यापारी पेठेत यंदा 79 गाळे असून, यामध्ये 50 टक्‍क्‍यांहून अधिक महिला उद्योजकांचा सहभाग आहे.

 


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: