माणिकराव ठाकरे यांचे पारडे जड?
-
Sunday, September 05, 2010 AT 12:49 AM (IST)
मधु कांबळे - सकाळ वृत्तसेवा
मुंबई - केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी जवळिक साधणाऱ्या महसूल मंत्री नारायण राणे व वनमंत्री पतंगराव कदम यांच्याशी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालविला असून तो महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी माणिकराव ठाकरे यांच्यासाठी शुभसंकेत असल्याचे मानले जात आहे. कॉंग्रेसमधील या बदलत्या समीकरणांमुळे ठाकरे यांच्याकडेच पुन्हा अध्यक्षपद येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदी काल सोनिया गांधी यांची अधिकृतपणे बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणूक प्रक्रियेच्या निमित्ताने मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोन दिवस दिल्लीत मुक्काम ठोकून होते. त्यानंतर माणिकराव ठाकरे व मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह हेही दिल्लीत दाखल झाले. या तीनही नेत्यांनी ज्येष्ठ नेत्यांपासून कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापर्यंत अनेकांच्या भेटीगाठी घेऊन राज्यात पक्षांतर्गत बदल होणार की नाही, याची चाचपणी केल्याचे सांगितले जाते.
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख व मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात सुप्त संघर्ष आहे. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होताच, अशोक चव्हाण यांनी लातूरचा महसुली विभाग नांदेडला हलविण्याचा घेतलेला निर्णय या वादाला कारणीभूत ठरला होता; तर एकेकाळी विलासरावांचेच समर्थक म्हणून ओळखले जाणारे माणिकराव ठाकरे यांची अध्यक्ष होताच मुख्यमंत्र्यांशी वाढलेली जवळिक विलासराव गटाला खटकली आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगूल वाजताच विलासराव गटाकडून अनेक नावे पुढे आली. त्यातच मुख्यंमत्र्यांवर नाराज असलेल्या नारायण राणे व पतंगराव कदम यांनीही विलासरावांशी जवळिक साधायला सुरुवात केल्यामुळे चव्हाण-ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती.
मुख्यमंत्री आपल्याला विश्वासात घेत नाहीत म्हणून राणे, तर आपल्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला वन खाते देऊन दुय्यम स्थान दिले गेल्याबद्दल कदम नाराज आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटले त्या वेळी राणे व कदम यांना डावलण्यात आले. याच प्रश्नावर कॉंग्रेसच्या वतीने सोनिया गांधी यांनाही मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले, त्या वेळीही राणे-कदम बाजूलाच राहिले. मंत्रालयात बाभळीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते; मात्र पतंगराव कदम यांना बोलाविण्यात आले नव्हते; तर दुसऱ्याच कामासाठी गेलेल्या राणे यांना बैठकीत सहभागी करून घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मुख्यमंत्री व राणे-कदम यांच्यातील दरी रुंदावत चालली होती.
मात्र प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी गटाला फार संधी मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आता विलासरावांच्या गोटात गेलेल्या राणे-कदम यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालविल्याचे समजते. त्यामुळेच त्यांनी काल नवी मुंबई विमानतळाच्या प्रश्नावर पंतप्रधांनाची भेट घेतली त्या वेळी नारायण राणे व पतंगराव कदम यांना आवर्जून आपल्यासोबत घेतले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी राणे यांना आपल्या बाजूला बसवून घेतले. चव्हाण-राणे-कदम यांच्यातील वाढणारी ही जवळीक प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा वर्णी लागण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माणिकरावांसाठी शुभसंकेत असल्याचे मानले जात आहे.