Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

भारतीय महिलांचा तिसरा पराभव
-
Sunday, September 05, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: women hockey,   sports,   india
रोझारियो (अर्जेंटिना) - भारतीय महिला हॉकी संघाला विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत सलग तिसऱ्या दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. "अ' गटात शुक्रवारी झालेल्या सामन्यात जर्मनीने भारताचा 4-1 असा पराभव केला. या पराभवाच्या मालिकेमुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यासारखेच आहे. याच गटातील अन्य एका सामन्यात हॉलंडने ऑस्ट्रेलियाला तेवढ्याच फरकाने पराभूत केले. जपान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 2-2, तर "ब' गटातील इंग्लंड आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. 

भारतीय महिलांच्या बचावातील गाफिलपणाचा पुरेपूर फायदा उठवत जर्मनीने सुरेख विजयाची नोंद करताना उपांत्य फेरी प्रवेशाच्या आपल्या आशा भक्कम केल्या. त्यांच्याकडून एलिन हॉफमॅन्न, माईके स्टोएकेल, नाताश्‍चा केल्लेर आणि लिडिया हॅसे यांनी गोल नोंदवले. भारताकडून पुन्हा एकदा केवळ राणी रामपाल हिलाच गोल करण्यात यश आले. भारताची गाठ आता जपानशी पडेल. "अ' गटातून आता हॉलंड आणि जर्मनी प्रत्येकी 9 गुणांसह आघाडीवर आहेत.

भारतीय माहिलांचा खेळ बघता पहिल्या दोन पराभवातून त्यांनी काही शिकल्याचे अजिबात दिसून आले नाही. अत्यंत संथ आणि बचावात मोकळ्या जागा ठेवून खेळणाऱ्या भारताने जर्मनीला वर्चस्व राखून देण्यास जणू मदतच केली. तरी जर्मनीला खाते उघडण्यासाठी बाविसाव्या मिनिटाची वाट बघावी लागली. त्यावेळी हॉफमॅन्न हिने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. अर्थात, त्यानंतर मिळालेल्या अन्य तीन कॉर्नरवर त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर भारताच्या पंधरावर्षीय राणी रामपाल हिने मैदानी गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. मात्र, मध्यांतराला तिन मिनिटे असताना स्टोएकेल हिचा क्रॉस फटका भारताची गोलरक्षक दीपिका मूर्ती हिला अडवता आला नाही आणि जर्मनीने आघाडी घेतली. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला मिळालेल्या शॉर्ट कॉर्नरवर भारताला गोल करण्याची संधी होती. मात्र, जर्मनीची गोलरक्षक ख्रिस्तीनी रेनॉल्डस हिच्या सुरेख प्रयत्नाने भारताला ती संधी साधता आली नाही. जर्मनीची अनुभवी खेळाडू केल्लेर हिने आपल्या स्टिकचे कौशल्य दाखवून भारताच्या बचाव फळीला त्रस्त केले. तिला अडविण्याच्या नादात भारतीय खेळाडूंनी चूक केली आणि मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर केल्लेर हिने जर्मनीचा तिसरा गोल केला. पुढे सामन्याच्या 49व्या मिनिटाला हॅस्से हिने मैदानी गोल करून जर्मनीची आघाडी भक्कम केली.

चीनचा पहिला विजय
पहिल्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या चीनने स्पर्धेतील पहिला विजय नोंदविताना दक्षिण आफ्रिकेचा 4-1 असा पराभव केला. मध्यांतराला 1-1 अशी बरोबरी राखल्यानंतर उत्तरार्धातील वेगवान खेळाच्या जोरावर चीनच्या महिलांनी सफाईदार विजय मिळविला. चीनकडून रेन ये आणि गाओ लिहुआ या दोघींनी गोल केले. आफ्रिकेकडून एकमात्र गोल जेनिफर विल्सन हिने नोंदविला. याच गटातील अन्य एका सामन्यात इंग्लंडने पिछाडीनंतर दक्षिण कोरियाविरुद्ध बरोबरी राखण्यात यश मिळविले. किम जोंग एयून हिने चौदाव्या मिनिटालाच कोरियाचा गोल केला. त्यानंतर उत्तरार्धाच्या सुरवातीलाच हेलेन रिचर्डसन हिने इंग्लंडला बरोबरी साधून दिली. या विजयाने चीनने उपांत्य फेरी प्रवेशाच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

हॉलंडच्या मार्टजे पौमेन हिने नोंदविलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर हॉलंडने ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा दणदणीत पराभव केला. पौमेन हिने तीनही गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले. स्पर्धेत तिने आतापर्यंत सात गोल केले असून, सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत ती आघाडीवर आहे. हॉलंडने स्पर्धेत तीन सामन्यांत 18 गोल केले आहेत. हॉलंडचा चौथा गोल मिंके स्मिट्‌स हिने केला. ऑस्ट्रेलियाकडून एकमात्र गोल निकोले अरनॉल्ड हिने केला.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: