Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

भारतातील विद्यापीठांचे पुढचे पाऊल...
माधव गोखले
Sunday, September 05, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: educon
शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रांमधल्या तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यात संवाद घडवणाऱ्या एज्युकॉन या राष्ट्रीय स्तरावरील कुलगुरूंच्या परिषदेने यंदा आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गोव्यात झालेल्या पहिल्या एज्युकॉनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान प्रभावीपणे अंगीकारण्याची आणि उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज अधोरेखित झाली होती. शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उद्योगांची मदत घेण्याबाबतही 2004च्या पहिल्या एज्युकॉनमध्ये चर्चा झाली होती. गेल्या महिन्यात कोलंबोत झालेल्या सहाव्या एज्युकॉनमध्ये सहभागी कुलगुरूंनी एकमताने केलेल्या ठरावात पहिल्या एज्युकॉनमध्ये झालेल्या चर्चेचे प्रतिबिंब पाहायला मिळते. उच्च शिक्षणच्या क्षेत्रातील दर्जेदार शिक्षकांची उणीव भरून काढण्यासाठी विद्यापीठांनी उद्योग क्षेत्रातल्या धुरीणांची मदत घ्यावी, अशी सूचना सर्व कुलगुरूंनी एकमताने केली.

"सकाळ' माध्यम समूहाच्या पुढाकाराने होणाऱ्या गेल्या सहा एज्युकॉन परिषदांच्या प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा मानायला हवा. उद्योग क्षेत्राच्या सहभागामुळे विद्यापीठांमधील संशोधन कार्याला भरीव मदत होईल. त्याबरोबरच शिक्षण आणि उद्योग जगतामधला संवाद आणखी दृढ होईल, असे मत कुलगुरूंनी व्यक्त केले. अभ्यासक्रमात कालसुसंगत बदल करण्याची गरज कोलंबोच्या परिषदेत बहुतेक वक्‍त्यांनी बोलून दाखवली. बदलत्या गरजांशी सुसंगत असे बदल अभ्यासक्रमात करणे, हे शिक्षणक्षेत्रासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहेच; पण अभ्यासक्रमातले बदल उद्योगांशी संवाद साधणारे असावेत, असेही मत आग्रहाने मांडले गेले. उद्याचे व्यावसायिक तयार करण्याची गरज भागविण्यात आजचे अभ्यासक्रम कमी पडत असतील, तर विद्यापीठांनी उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्याची गरज परिषदेत आग्रहाने मांडली. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारणेही आवश्‍यक आहे. विद्यापीठांमधील विविध समित्यांवर उच्चशिक्षित आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीत रस असणाऱ्या व्यक्तींच्याच नियुक्‍त्या व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करणारा ठरावही एज्युकॉन 2010 परिषदेने एकमताने मंजूर केला. कुलगुरूंना विद्यापीठाचा कारभार चालवण्याचे पूर्ण अधिकार दिल्यास केवळ गुणवत्तेच्या निकषाच्या आधारे सामाजिक, औद्योगिक आणि शिक्षण क्षेत्रातल्या जाणकारांचा विद्यापीठासाठी उपयोग करून घेता येईल, असे मत ठरावात व्यक्त करण्यात आले आहे. एज्युकॉन परिषदेला सुरवात झाली तेव्हाही उच्च शिक्षण क्षेत्र संक्रमणावस्थेत होते. बदलाचा वेग आताही मोठा आहे.

परदेशी विद्यापीठेही आता स्पर्धेत आहेत. अनुत्पादक शिक्षणापासून दूर जाऊन दर्जेदार शिक्षण सर्वांना देण्याच्या दिशेने मानसिकता बदलण्याकडे भारतीय विद्यापीठांनी एज्युकॉनच्या माध्यमातून आणखी एक पाऊल टाकले आहे.
प्रतिक्रिया
On 9/5/2010 3:18 AM abhijeet said:
pawul padate pudhe


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: