पाकने खेळलेला प्रत्येक सामना फिक्स - हमीद
वृत्तसंस्था
Sunday, September 05, 2010 AT 09:21 AM (IST)
लंडन - पाकिस्तानी खेळाडूंविरुद्ध स्पॉट फिक्सिंगचा फास आवळत असतानाच आज (रविवार) 'न्यूज ऑफ दी वर्ल्ड' या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात पाकिस्तानचा खेळाडू यासिर हमीद याने पाकने खेळलेला प्रत्येक सामना फिक्स असल्याची कबुली दिल्याचे म्हटले आहे. या वृत्ताने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, यासिर हमीदने मात्र आपण असे बोललोच नसल्याचे म्हटले आहे.
या वृत्तपत्राने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज यासिर हमीद याने म्हटले आहे की, ''पाकिस्तानी खेळाडू सट्टेबाजांशी हातमिळवणी करून प्रत्येक सामना फिक्स करीत आहेत. स्कॉटलंड यार्डकडून तपासणी होत असल्याने आता काय होणार हे देवालाच माहित. मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, इतर खेळाडू सामना फिक्स करतात.''
यासिर हमीद याला इंग्लंडविरुद्ध लॉर्डस येथे झालेल्या कसोटीत पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले होते. याच कसोटीत स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप महंमद आमिर आणि महंमद आसिफ यांच्यावर करण्यात आला आहे. वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार सामन्यात फिक्सिंग करण्यासाठी यासिर हमीद सटोडियाकडून दीड लाख पौंडची ऑफर मिळाली होती. मात्र, त्याची आय़सीसीच्या लाच-लुचपत प्रतिबंधक पथकाकडून चौकशी करण्यात आलेली नाही. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आयसीसीने सलमान बट्ट, महंमद आमिर, महंमद आसिफ या तिन्ही पाकिस्तानी खेळाडूंना निलंबित केले आहे.
या तीन खेळाडूंव्यतिरिक्त आयसीसी आणखी एका पाकिस्तानी खेळाडूची फिक्सिंगप्रकऱणी चौकशी करीत आहे. मात्र, या खेळाडूचे नाव जाहीर करण्यात आले नसल्याचे, या वृत्तपत्राने म्हटले आहे. यासिर हमीदने पाकिस्तानमधील 'द डॉन' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.