इस्लामाबाद - "स्पॉट फिक्सिंग'मध्ये संशय असलेल्या आणि चौकशी सुरू असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना आता विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयसीसीने तर चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावर बंदी घातली आहे. आता आयसीसीच्या पुरस्कार यादीतून महंमद आसिफ आणि महंमद आमीर यांना वगळण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानच्या या दोन्ही वेगवान गोलंदाजांना नामांकन देण्यात आले होते; परंतु आता त्या दोघांनाही वगळण्यात आले असल्याचे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले. महंमद आमीरला सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूसाठी, तर महंमद आसिफला सर्वोत्तम कसोटीपटूच्या विभागात नामांकन मिळाले होते.
आमीर, आसिफसह सलमान बट्टची स्पॉट फिक्सिंगप्रकरणी स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांना इंग्लंडविरुद्धच्या झटपट क्रिकेट मालिकेसाठी वगळण्यात आले आहे.