Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

वाटचाल एका शैक्षणिक चळवळीची(व्हिडिओ)
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 07:04 PM (IST)
Tags: educon
देशातील प्रमुख विद्यापीठांच्या कुलगुरुंसमवेत विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या सभेचे हे सहावे वर्ष, म्हणजे अर्धे तप झाले. यानिमित्ताने "सकाळ'तर्फे आयोजित केलेल्या 'एज्युकॉन' उपक्रमाचे अवलोकन करणे सार्थ होईल, असे वाटते. दर वर्षी आपण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगळ्या देशांत ही सभा घेतो. त्यानिमित्ताने नवीन देशांचाही काही प्रमाणात परिचय होतो. साहजिकच आपण आपल्या देशांत काय करायला हवे, काय नको, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा दृष्टीकोन याचे आपोआपच विवेचन होते.

श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या एज्युकॉन 2010 चर्चासत्राच्या सुरवातीलाच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे उपाध्यक्ष डॉ. पंकज चांदे यांनी विद्यापीठांची संकल्पना भारतात हजारो वर्षांपासून असल्याचे सांगत आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जा पुन्हा गाठायचा आहे याची जाणीव करून दिली. आपल्या देशात नालंदा विद्यापीठाच्याही अगोदर कौंडिण्यपूर हे योगाचा अभ्यास करणारे विद्यापीठ तर गुणशीला हे फक्त महिलांसाठीचे विद्यापीठाही होते अशी माहिती दिली. कितीही अडचणी आल्या तरी जोपर्यंत आपल्या मनात, कृतीत विद्यार्थ्यांच्या पर्यायी समाजाच्या भलेपणाची भावना आहे, तोपर्यंत अडचणींची पर्वा न करता आपण सर्वजण सतत प्रयत्न करत राहू, त्यासाठी उद्योग क्षेत्रांतील, समाजातील विविध धुरीणांची मदत घेऊ. प्रगतीशील शैक्षणिक अभ्यासक्रम करीत राहू, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना ज्ञानाची दारे उघडी करून संशोधनासाठी उत्तेजन देऊ आणि याद्वारे भारतातील प्रत्येक विद्यार्थी नोकरी अथवा व्यवसायास पात्र होईल, यासाठी पाऊले उचवू अशा निश्चयी वातावरणात एज्युकॉनचा समारोप झाला.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगांवकरांप्रमाणेच अनेकांनी इतकी उत्कृष्ट चर्चासत्रे आयुष्यात क्वचितच अनुभवास येतात, अशी दाद दिली. समारोपाच्या भाषणात "सकाळ'ला मनःपूर्वक धन्यवाद देत सर्व कुलगुरुंनी उभे राहून मानवंदना दिली. माझ्या मते "सकाळ'च्या आयुष्यात हा एक अतीव समाधानाचा क्षण होता. "सकाळ'ने घेतलेल्या या कृतीशील पुढाकाराचे देशभरातून परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व कुलगुरुंनी कौतुक करून मनःपूर्वक धन्यवाद दिले. "सकाळ'बद्दल सर्वांच्याच अपेक्षा खूप वाढल्या. "एज्युकॉन' ही एक शैक्षणिक चळवळ, या क्षेत्रांतील विचारवंतांचे व्यासपीठ बनावे अशी सर्वांगीण मागणी झाली. प्रत्येक कुलगुरू आपल्या विद्यापीठांतील यशस्वी प्रयोग, त्यामागची भूमिका सांगत इतरांना प्रशिक्षित करीत होते. उद्योगविश्वातील अनेक तज्ज्ञही या समारंभाला उपस्थित होते.

एज्युकॉन 2010च्या समारोपाच्या सत्रात उपस्थित कुलगुरूंनी उभे राहून "सकाळ माध्यम समूहा'ने परिषदेच्या आयोजनात घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले त्या वेळचा क्षण.
 
"गुरुकुल ऑनलाईन'चे शैलेश मेहता यांनी परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय लोक सुमारे दोन ते अडीच कोटी डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम खर्च करतात आणि दरवर्षी परदेशी जाणाऱ्या लाखभर विद्यार्थ्यांतील 90 टक्के विद्यार्थी परत येतच नाहीत, अशी माहिती दिली. आपल्या विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण केल्यास हे पैसे देशात राहतीलच पण हा बुद्धिमान विद्यार्थी वर्ग आपल्या प्रगतीचा वेग 8 टक्‍क्‍यांवरून 12 टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यास उपयुक्त ठरेल, असे सांगितले. आपल्याकडे बुद्धिमान विद्यार्थी वर्ग जगातील कोठल्याही देशापेक्षा मोठा असल्याने, भारतासाठी ही प्रचंड संधी आहे, असा व्यावहारिक सल्लाही मेहता यांनी दिला. रायगड जिल्ह्यातल्या डॉ.आंबेडकर तंत्रज्ञानविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजू मानकर यांनी सर्व सभाच जिंकली. कितीतरी सोपे, उपयुक्त प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. याही पुढे जाऊन भोवतालच्या मोठ्या उद्योगधंद्याचे सहकार्य मिळवून ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे पुनर्वसन करण्यात यश मिळविले. विविध उद्योजकांनीही अनेक उपक्रम कसे करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. यामुळे विद्यापीठाने समाजातील उपलब्ध असलेल्या तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे आणि त्याचा विद्यार्थी जगाला फायदा करून द्यावा.

प्राध्यापकांचे प्रशिक्षणही कायमची बाब मानावी जेणेकरून त्यांची गुणवत्ता सातत्याने वाढत जावी, याबद्दलही एकमत झाले. हे सर्व घडविण्यासाठी "सकाळ'ने म्हणजे "एज्युकॉन'ने सातत्याने पुढाकार घ्यावा अशी या ही वर्षी एकमताने मागणी झाली. केलेल्या यशस्वी प्रयत्नांच्या समाधानाबरोबरच अपेक्षांची जबाबदारी खांद्यावर घेत आम्ही "सकाळ'कारांनी श्रीलंकेचा निरोप घेतला तो पुढील वर्षी अधिक सक्रीय चर्चासत्र करण्याच्या निश्चयातूनच !

एक होण्यातच देशहित; एकमेकांच्या खच्चीकरणात नव्हे
श्रीलंकेला ही माझी पहिलीच भेट. काही लोकांच्या ओळखी होत्या. रविंद्रन हे उद्योजक आंतरराष्ट्रीय रोटरी क्‍लबचे संचालक. त्यांच्या घरी आम्ही जेवायला गेलो असताना अनेकांचा परिचय झाला. श्रीलंकेत सर्वत्र वनश्रीचे आच्छादन व स्वच्छता. साक्षरता 90 टक्‍क्‍यांच्याही पुढे. लोक शिस्त पाळतात. शिवाय रस्त्यावर थुंकल्यास अथवा कचरा टाकल्यास कोणाच्याही वशिल्याची पर्वा न करता तुरुंगातच रवानगी होते. हे सार्वत्रिक स्वच्छतेचे कारण होते. मी "एज्युकॉन'बद्दल सांगितले तेव्हा श्रीलंकेचे एक ज्येष्ठ नागरिक उद्‌गारले, ""भारताने विद्यापीठांतील शिक्षणामुळे आमच्या पुढे मोठी आघाडी घेतली आहे. आमच्याकडे शालेय शिक्षण सर्वांनाच घ्यावे लागते; पण विद्यापीठांची मोठी कमतरता आहे.'' त्यांच्या या विधानामुळे मला गेल्या शतकांत शिक्षणासाठी ज्यांनी आपली आयुष्ये वेचली त्यांचे ऋण ध्यानात आले. हा प्रामुख्याने बौध्दधर्मीय देश. तो शांतताप्रधान वाटला. भारताला येथे प्रचंड संधी आहे, याचीही जाणीव झाली. भारतीय वकिलातीमधील एक तरूण अधिकारी आत्मविश्‍वासाने भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाबद्दल बोलत होते. माझे श्रीलंकेतील मित्र म्हणाले, ""तुमच्याकडे केवढी बुद्धिमत्ता आहे. ती ठायी ठायी आम्हाला दिसते. याचमुळे तुम्ही आमच्या निदान 25-30 वर्षे पुढे आहात आणि आता तर तुमचा वेग वाढतच राहणार आहे, हे स्पष्ट दिसते आहे.'' देशहित हे एकत्र बळ वापरण्यात आहे, एकमेकांचे खच्चीकरण करण्यात नाही, हे आपल्याकडे धर्म, प्रांतीयवाद, भाषावाद अथवा जात या नावाखाली प्रक्षोभ उभे करणाऱ्या लोकांना समजायलाच हवे. प्रगत चीन आणि धर्मांध तालिबान आपल्या विनाशाची संधी शोधत असतात. वाद असू शकतात, पण ते समाजप्रगतीच्या आड येऊ नयेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: