बिहारमधील तीन पोलिसांच्या सुटकेबाबत साशंकता
वृत्तसंस्था
Sunday, September 05, 2010 AT 08:38 AM (IST)
पटना - बिहारमधील लखीसराई येथून अपहरण करण्यात आलेल्या तीन पोलिसांच्या सुटकेबाबत अद्याप साशंकता आहे. माओवाद्यांनी या तिघांना जंगलात सोडले असल्याचे वृत्त आहे, पण हे तिघे सुखरुप असल्याची पाहणी केल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही, असे पोलिस महासंचालक नीलमणी यांनी सांगितले.
गेल्या रविवारी माओवाद्यांनी लखीसराई येथून चार पोलिसांचे अपहरण केले होते. त्यातील एक पोलिसाचा शुक्रवारी माओवाद्यांकडून खून करण्यात आला होता. यामुळे या तिन्ही पोलिसांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. आज काही वृत्तवाहिन्यांनी या तिन्ही अपहृत पोलिसांना सोडण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. मात्र, अधिकृतरित्या या तिघांची सुटका झाल्याचे स्पष्ट करण्यात आलेले नाही. अपहृत झालेल्या तीन पोलिसांची अभय यादव, एहतशाम खान, रुपेश ही नावे आहेत. माओवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून शनिवारी जंगल प्रभावित क्षेत्रात कोंबिंग ऑपरेशनही राबविण्यात आले होते.