'आयसीसी' स्वतंत्र चौकशी आयुक्त नेमणार'
वृत्तसंस्था
Sunday, September 05, 2010 AT 11:23 AM (IST)
न्यूयॉर्क - क्रिकेट विश्व ढवळून टाकणाऱ्या "फिक्सिंग' प्रकरणासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कडक पावले उचलण्याचे ठरविले असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी आयुक्त नियुक्त करण्याची घोषणा "आयसीसी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली.
ते म्हणाले, ""या प्रकरणात अजून कोणावरही कारवाई करण्यात आली नसली तरी "आयसीसी'च्या वतीने होणाऱ्या स्वतंत्र चौकशी समितीसमोर या खेळाडूंना आपली बाजू मांडावीच लागेल. या समितीच्या अहवालानुसार "आयसीसी' कारवाईचा निर्णय घेईल.'' विशेष म्हणजे "आयसीसी'ने यापूर्वीच सलमान बट्ट, महंमद आमीर, महंमद आसिफ यांना तातडीने निलंबित केले आहे. त्यांना या कारवाईविरोधात अपील करण्यासाठी चौदा दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. "आयसीसी'च्या आचारसंहिता कलम पाचनुसार त्यांना हा अधिकार देण्यात आला आहे.
"आयसीसी'ने ही कारवाई केल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी ही कारवाई जाणूनबुजून केल्याची टीका पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाजिद हसन यांनी केली होती. या संदर्भात पवार म्हणाले,""आम्ही कोणावरही कारवाई केलेली नाही. आम्ही त्यांना निलंबित करण्याची नोटीस पाठविली आहे. अर्थात, हा अंतिम निर्णय होऊ शकत नाही. या प्रकरणाची चौकशी अजून चालू आहे. त्यांना आपली बाजू मांडता यावी, यासाठीच हे पाऊल उचलले आहे.'' राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उत्तर अमेरिकेतील शाखेचे उद्घाटन करण्यासाठी पवार येथे आले होते.
दरम्यान, "आयसीसी'ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार दोषी खेळाडूंवर चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्पुरती बंदी लादण्यात आल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरून लॉर्गट म्हणाले, ""आम्ही क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार सहन करणार नाही. अशा प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी आम्हाला कडक पावले उचलावीच लागतील. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्या खेळाडूंना आजीवन बंदीला सामोरे जावे लागेल.''