यवतमाळमध्ये भर दिवसा गुंडाचा खून
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 02:57 PM (IST)
यवतमाळ - शहरातील संघटित टोळी युद्धाने पुन्हा एकदा भडका घेऊन त्यात अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद शिरावर असलेल्या एका गुंडाचा भर दिवसा शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. ही घटना आज (ता. 7) सकाळी सात वाजता शहरातील भाजीमंडईत भरलेल्या आठवडी बाजारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवकासह दोन संशयितांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे.
बाल्या ऊर्फ योगेश पलकंडवार ( वय 28, रा. पवारपुरा) असे मृताचे नाव आहे. शहरातील गुन्हेगारी वर्तुळात सक्रीय असलेल्या दिवटे टोळीचा तो समर्थक होता. गेल्या काही दिवसांपूर्वी बाल्याने त्याच्या दोन साथीदारासह शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या ढाब्यावर ढाबाचालकांशी वाद करून त्यांच्यावर पिस्तूल रोखली होती. त्याच प्रकरणातून हे कृत्य घडले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिरूद्ध अढाव, वडगाव रोड पोलिस ठाण्याचे ठाणेदार वैजनाथ लटपटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रवाना केला. विशेष म्हणजे ज्या भाजीमंडईत हा प्रकार घडला, त्या ठिकाणी रविवारचा आठवडी बाजार भरत असतो. त्यामुळे या घटनेच्यावेळी बाजारात शेकडो नागरिक उपस्थित होते. त्यांच्यासमक्षच हा खून करण्यात आला. घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांची घटनास्थळी गर्दी केली होती. याप्रकरणी मृताचा भाऊजी अविनाश मानेकर, रा. साईमंदिर परिसर याने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यात ही घटना त्याने स्वत: पाहिल्याचे नमूद करीत चार मारेकऱ्यांची नावे स्पष्ट केली आहेत. या माहितीवरून वडगाव रोड पोलिसांच्या डी. बी. पथकाने तातडीने पालिकेचे नगरसेवक महेश मुराब आणि ढाबा व्यवसायिक सुनील पाली या दोघांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप गुन्ह्यांची माहिती प्राप्त झालेली नाही. यवतमाळ येथे संघटित गुन्हेगारी टोळ्यामधून नेहमीच खून होत असतात. अगदी दोन महिन्यापूर्वीच याच टोळीचा समर्थक असलेल्या सलीम इक्का याचाही असाच खून झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिस प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे झाले आहे.