मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्यास अटक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 01:20 AM (IST)
मुंबई - स्वतःला अल् कायदाचा सदस्य असल्याची बतावणी करणाऱ्या एका व्यक्तीने शुक्रवारी "वर्षा' बंगल्यावर फोन करून मुख्यमंत्र्यांबाबत विचारणा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर तपासयंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा राज्य दहशतवादविरोधी पथकाने गनी शहा (वय 32) याला नाशिक येथून अटक केली आहे.
मूळचा मालेगावचा राहणारा गनी शहा याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एटीएसच्या मुंबई आणि नाशिक येथील तुकड्यांनी ही कारवाई केली. त्याच्याकडून आठ सिमकार्ड हस्तगत केल्याची माहिती एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी दिली.
"घरात आहेत का?'
मलबार हिल येथे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानात काल (ता. 3) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा दूरध्वनी आला होता. या वेळी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने, "मुख्यमंत्री घरात आहेत का?' अशी विचारणा केली. बंगल्यावर नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्याने दूरध्वनी करणाऱ्याला त्याची ओळख विचारली. तेव्हा, आपण "अल कायदा' या अतिरेकी संघटनेचे सदस्य असल्याचे त्याने सांगितले. या दूरध्वनीने गाळण उडालेल्या त्या कर्मचाऱ्याने बंगल्यावरील पोलिस आणि सुरक्षा ताफ्यातील अधिकाऱ्यांना ही माहिती कळविली.
या प्रकाराची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा, तसेच दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांकडूनही दूरध्वनी करणाऱ्या या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. हा दूरध्वनी कुठून आला, तसेच तो कोणी केला, याचा तपास सध्या सुरू आहे. सहपोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी याबाबत प्रारंभी काहीही बोलणे योग्य नसल्याचे सांगितले होते.
सुरक्षाव्यवस्थेत वाढ
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलेला हा दूरध्वनी बोगस असण्याची शक्यता पोलिस आयुक्त संजीव दयाळ यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना वर्तविली होती. मात्र यानंतर काही वेळातच नाशिक येथून गनी याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिस दलातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.