Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अपहृत पोलिसांबाबत बिहारमध्ये संभ्रम कायम
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Sunday, September 05, 2010 AT 08:38 AM (IST)
Tags: maoist,   police,   bihar,   patna,   national,   snn

पाटणा - बिहारच्या लखिसराय जिल्ह्यातील तीन अपहृत पोलिसांची सुटका केल्याचा दावा माओवाद्यांनी केला. मात्र, त्याबाबत सरकारने दुजोरा दिलेला नाही. पोलिसांच्या सुटकेबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे. त्यामुळे अपहृत पोलिसांचे कुटुंबीय त्यांच्या परतीकडे नजर लावून आहेत. या प्रकरणात माओवादी पोलिसांबरोबर खेळ खेळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बुद्धिजीवी, साहित्यिका महाश्‍वेतादेवी, सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांच्या आवाहनानंतर अपहृत पोलिसांची सुटका केल्याचा दावा माओवादी प्रवक्ता अविनाश याने केला. काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्याने दूरध्वनीवरून संपर्क साधला. राज्य सरकारने शनिवारी (ता. 5) बोलावलेली सर्वपक्षीय बैठक किंवा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या आवाहनाचे या पोलिसांच्या सुटकेत कोणतेही योगदान नसल्याचेही त्याने म्हटले आहे. पिंटू आणि बहादूर यादव या दोन माओवाद्यांना अटक केल्याचा पोलिसांचा दावा खोटा असल्याचा दावाही अविनाशने केला. हे दोघे निर्दोष गावकरी असून, त्यांच्याकडून
जबरदस्तीने लखिसराय जिल्ह्यातील चकमकीत सहभागी झाल्याची कबुली घेतल्याचा आरोपही त्याने केला.

माओवाद्यांनी संबंधित पोलिसांच्या सुटकेचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत या पोलिसांचा पत्ता लागलेला नव्हता. सरकारतर्फे पोलिस जवान लुकास टेटे हा जनतेच्या सेनेवर हल्ला करण्यासाठी आला होता. त्यामुळे त्याची हत्या केल्याचे अविनाशने म्हटले आहे. मृतांमध्ये पोलिस जवान अभय यादव याचे नाव समाविष्ट केल्याबद्दल त्याने माफीही मागितली. दूरध्वनी खराब असल्याने हा प्रकार घडल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, माओवाद्यांची धरपकड करण्यासाठी लखिसराय, जमुई, मुंगेर आणि बाका जिल्ह्यांत सुरू असलेली मोहीम शिथिल करण्यात आल्याचे समजते. मात्र, पोलिस मुख्यालयाचे प्रवक्ते पी. के. ठाकूर यांनी केंद्रीय पथकांच्या मदतीने ही मोहीम सुरूच असल्याचा दावा केला.

माओवाद्याला बांधली राखी
अपहृत पोलिस जवान अभय यादवच्या खगडिया जिल्ह्यातील घरी आज सकाळी एक माओवादी हजर झाला. त्याचा चेहरा कपड्याने झाकलेला होता. अभयची पत्नी रंजना ही आपल्याला बहिणीसारखी असून, माओवाद्यांनाही भाऊ-बहीण असतात, असे सांगतानाच अभयची सुटका करण्याचे आश्‍वासन त्याने दिले. रंजना यांनी या माओवाद्याला राखी बांधली. त्यानंतर तो तेथून निघून गेला.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: