Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

शालाबाह्य या लेकरांपुढे व्यवस्था आणखी कितीदा हरणार आहे?
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 12:30 AM (IST)
शिक्षणाचा कायदा झाला असला तरी राष्ट्राची संपत्ती असणारी लाखो मुले आज शिक्षणाच्या परिघाबाहेर आहेत. त्यांना प्रवाहात आणण्याचे आव्हान आपणासमोर आहे. आज शिक्षक दिनानिमित्त प्रत्येक मूल शाळेत दाखल करण्याचा संकल्प केला जावा.

दिसतोस मला तू लेकरा,
उसाच्या फडात, ऊस तोडत
कोयत्याचे वार स्वतःच्या
भवितव्यावर करताना
धगधगत्या बॉयलरमध्ये स्वप्नांची राख करत
बालपणीच आयुष्याची मळी होताना

त्याच दीन चेहऱ्याने
भेटतोस मला वीटभट्टीवर
भट्टी रचता रचता जगण्याचेच सरण रचताना
जिथं भाजणाऱ्या विटांसोबत शिक्षण सती जातं

दगडखाणीत बापासोबत दगड फोडताना
तुझे रक्ताळलेले कोवळे हात
नकोच दाखवू मला
तुझे निबर होत चाललेले हात-
आमच्या निबर संवेदनांचे
जणू काव्यात्म प्रतीक

तुझ्या झोपडीबाहेर राहिलो उभा
तेव्हा लहान भावंड कडेवर घेऊन तू आलीस
अकाली प्रौढ झालेली ....
चुलीच्या धुरात तू भाकरी थापताना
तुझ्या डोळ्यांतली शिक्षणाची स्वप्नं
बरे झाले मला दिसली नाहीत....
सावित्रीनं विचारलं तर तिला काय सांगू?

तू भेटलीस पुन्हा सिग्नलजवळ
गाडीच्या बंद काचेवरून
केविलवाणे हात फिरवताना
तुझे पिंजारलेले केस
डोळ्यांतली अगतिक लाचारी
भुकेनं आलेली चेहऱ्यावरची व्याकूळता...
मी एक रुपया तुझ्याकडे फेकून
गाडी स्टार्ट केली
प्रश्नांपासून सुटका करून घेण्याची किंमत
फक्त एक रुपया....

मध्यरात्री पिक्‍चर सुटल्यावर
लालबत्तीजवळून आलो
आंबटशौकीन उत्सुकतेनं बंद दारांकडे बघताना
एका दुकानाच्या फळीवर
इतक्‍या थंडीत तू झोपलेला.
आईनं गिर्हाईक आलं म्हणून बहुधा हाकललेला...
कसं विचारू तुला मित्रा,
उद्या शाळेत येशील का...?

गुरं वळताना
तुझ्या खांद्यावरच्या काठीला लटकतात
या देशातील सारे शैक्षणिक आयोग....
ओढ्यावर खेकडं पकडताना
आमच्या कुठल्याच योजनेच्या
जाळ्यात तू का घावत नाहीस....?
बिचारी पाखरं मारण्यापेक्षा
का नेम धरून मारत नाहीस गलोल
तुझ्या निरक्षरतेच्या वर्मावर....?

ईदच्या चॉंदसारखा तुझा चेहरा,
गॅरेजमध्ये कामाला गेल्यापासून
अमावास्येसारखा काळवंडून गेलाय
धरणाचा फुटलेल्या बांधासारखी
तुझ्या मोहल्ल्यातील गळती रोखायला
आणखी किती "सच्चर' हवे आहेत....?

का?
का पुन्हा मला खजील करतोस?
का मला दिसतोस पुन्हा पुन्हा?
चहाच्या गाडीवर, हॉटेल, धाब्यावर,
गॅरेजपासून कारखान्यापर्यंत
तुझ्या हातून चहा घेताना
आम्हाला मळमळत नाही
की तुझ्यासाठी मन कळवळत नाही
मुले राष्ट्राची "संपत्ती' असं म्हणतात
म्हणून लहानपणापासूनच
पैसे कमवायला हवेत....?

मी थांबवतोच तुला
पण तू थांबत का नाहीस?
भटक्‍या विमुक्‍त्यातल्या लेकरा
जन्मभर का असाच भटकत फिरणार आहेस?
तुझ्या बहुरुप्याच्या नकला बघून
हसूच येत नाही बघ
दोरीवरून स्वतःचा तोल सावरणारा तू
शिक्षणाच्या दोरीत येणारच नाही का?
शिक्षण कायद्याचा वाजणारा नगारा
तुझ्या ढुमक्‍याच्या नादात,
कधी ऐकणारच नाहीस का?

शालाबाह्य या लेकरांपुढं व्यवस्था
आणखी कितीदा हरणार आहे?
माझ्याच पोटचं लेकरू मला,
या लेकरांच्या चेहऱ्यात
कधी दिसणार आहे....?

- हेरंब कुलकर्णी
प्रतिक्रिया
On 9/5/2010 2:37 PM Gokul said:
It made me cry . . . so touchy
On 9/5/2010 12:09 PM anjali nalamwar said:
ii want to do something for child education i am related with education field so please guide me i am interested to do work
On 9/5/2010 1:24 AM manasi palkar said:
हेरंभ खरे आहे तुम्ही म्हणता ते.!अचूक शब्दात मांडले आहे.शिक्षण क्षेत्रात मी १२ वर्षे काम केले आहे ,काही करायचे आहे.तुमच्याकडे काही योजना असल्यास सांगा.मी सहभागी होईन.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: