Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

...तर "आयसीसी'वर कायदेशीर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: icc,   spot fixing,   pcb,   cricket,   karachi,   london
लंडन/कराची - "स्पॉट फिक्‍सिंग'प्रकरणी संशयित पाकिस्तानी खेळाडूंवर चौकशीपूर्वीच थेट निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेणाऱ्या शिखर संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) निषेध व्यक्त करत, या प्रकरणी खेळाडू निर्दोष आढळल्यास "आयसीसी'वर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) शनिवारी दिला.

""फिक्‍सिंग प्रकरणातील चौकशी अजूनही संपलेली नाही. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी पाकिस्तानी खेळाडूंना केवळ संशयित जाहीर केले आहे. त्यांच्याविरुद्ध कुठलेही आरोप ठेवलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात जर हे खेळाडू दोषी आढळले नाहीत, तर "पीसीबी'ने "आयसीसी'वर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी ठेवली आहे,'' असे"पीसीबी'चे कायदेशीर सल्लागार तौफिक रिझवी यांनी सांगितले. "आयसीसी'ने आपले अधिकार वापरून चौकशीपूर्वीच कारवाई केली आहे. खेळाडूंवर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोपही ठेवण्यात आलेले नाहीत. चौकशीत पाकिस्तानी खेळाडूंनी पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली आहे, त्यामुळेच त्यांना काल रात्री सोडून देण्यात आल्याचेही रिझवी यांनी स्पष्ट केले.

वाजिद अजूनही आक्रमक
खेळाडूंसंदर्भात "आयसीसी'ने घेतलेल्या निर्णयाविरोधात "पीसीबी' काहीसे दबकून बोलत असले, तरी पाकिस्तानचे लंडनमधील उच्चायुक्त वाजिद हसन यांनी सलग दुसऱ्या दिवशी "आयसीसी'वर चौफेर टीका केली. पाकिस्तानी खेळाडू दोषी असल्याचे ग्राह्य धरूनच "आयसीसी' आपले धोरण ठरवत आहे. प्रकरणाच्या दुसऱ्या बाजूचा विचार करण्याची त्यांची मानसिकताच दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. "आयसीसी'ला यातून काही वेगळेच सिद्ध करायचे दिसून येत असल्याचा संशयही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

वाजिद हसन "आयसीसी'वर थेट टीका करत असले, तरी त्यांना प्रत्यक्ष पाकिस्तानातून विरोध होत आहे. हे प्रकरण हाताळण्यास "पीसीबी' समर्थ असून, देशाचे उच्चायुक्त असताना त्यांनी या प्रकरणात लक्ष घालणे मुळात योग्य नाही. यामुळे "पीसीबी'समोरील आव्हान अधिक कठीण होईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. "आयसीसी'चे अध्यक्षपद भारताच्या शरद पवार यांच्याकडे असून, पाकिस्तानी खेळाडूंना गुंतविण्यात भारताचाच हात असल्याची त्यांची टीका चुकीची असून, यातून दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडण्याचीच चिन्हे असल्याचे मत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: