ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Sunday, September 05, 2010 AT 01:31 PM (IST)
बालासोर - भारताने 290 किलोमीटर पल्ल्याच्या ब्राह्मोस "क्रूज' क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी केली. ओरिसाच्या चंडीपूर येथील "आयटीआर' (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज) तळावर सकाळी साडेअकराच्या सुमारास "मोबाईल लॉंचर'वरून ही चाचणी घेण्यात आली. याद्वारे "ब्राह्मोस'ची क्षमता तपासण्यात आल्याचे संरक्षण संशोधन व विकास संस्थेकडून (डीआरडीओ) सांगण्यात आले.
दहशतवादी केंद्र जमीनदोस्त करण्यासह थेट हल्ल्यांसाठी "ब्राह्मोस-2' उपयोगात आणता येते. संबंधित परिसराची जास्त हानी न करता याद्वारे लक्ष्यभेद करता येतो. ध्वनीच्या वेगापेक्षा 2.8 वेगाने 300 किलोपर्यंतची पारंपरिक शस्त्रे वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. समुद्रसपाटीपासून सर्वांत कमी दहा मीटर उंचीवरून हे क्षेपणास्त्र जमिनीवरील लक्ष्य उद्ध्वस्त करू शकते. रशियाबरोबर संयुक्तपणे विकसित केले जात असलेले "ब्राह्मोस' जमीन, विमान, पाणबुडी अशा बहुस्तरीय तळांवरून प्रक्षेपित करता येते. मात्र, प्रामुख्याने त्याच्या जमीन व पाणबुड्यांवरील चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
"ब्राह्मोस-1' प्रकारातील 67 क्षेपणास्त्रे यापूर्वीच लष्करात कार्यान्वित करण्यात आली आहेत. नौदलाने 2005 पासून सर्व युद्धनौकांवर या प्रकारातील क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. छोट्या लक्ष्यांचा भेद करण्यासाठी "ब्राह्मोस ब्लॉक-2' प्रकारातील क्षेपणास्त्र लवकरच समाविष्ट केले जाणार आहे. चंडीपूर तळावरून 12 जून 2001 ला "ब्राह्मोस'ची पहिली चाचणी करण्यात आली होती. शेवटची यशस्वी चाचणी 21 मार्च 2010 ला करण्यात आली होती.