Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

शारापोवा-वॉझ्नियाकी लढत रंगतदार ठरणार
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 12:30 AM (IST)

न्यूयॉर्क - अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उद्या होणाऱ्या प्रथम मानांकित कॅरोलिन वाझ्नियाकी आणि मारिया शारापोवा यांच्यातील चौथ्या फेरीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल. काल या दोघींनी सहजपणे विजय नोंदवीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर आणि रॉबिन सॉडर्लिंग यांनी आगेकूच केली. या दोघांची वाटचालही उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकण्याच्या दिशेने झाली आहे.

शारापोवा आणि वॉझ्नियाकी यांच्यातील सामन्याकडे "ड्रीम' लढत म्हणून बाघितले जात आहे. काल या दोघींनी तिसऱ्या फेरीतील सामना अवघ्या 73 मिनिटांत जिंकला. शारापोवाने अमेरिकेच्या ब्यूट्रिका कोप्रा हिला 6-0, 6-0 असे हरविले, तर डेन्मार्कच्या वॉझ्नियाकीने तैवानच्या चान यंग यान हिला 6-1, 6-0 असे पराभूत केले. गेल्या चार वर्षांत शारापोवाने प्रथमच या स्पर्धेच्या शेवटच्या सोळा खेळाडूंत स्थान मिळविले आहे. तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला साफ निष्प्रभ केले. रशियाच्या या खेळाडूने 2006 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. काल जोरदार वारे वाहत असताना शारापोवा आणि वॉझ्नियाकी यांनी केलेला खेळ तितकाच जोरदार होता. वॉझ्नियाकी आणि चान यंग यान यांच्यातील सामन्यात पहिल्या दोन गेममध्ये परस्परांच्या सर्व्हिस भेदल्या गेल्या, परंतु त्यानंतर वॉझ्नियाकीने पूर्णतः वर्चस्व गाजविले. गेल्या वर्षी तिने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यावेळी सेरेना विल्यम्सने माघार घेतल्याने प्रथम मानांकन मिळालेल्या वॉझ्नियाकीने आत्तापर्यंत फक्त तीन गेम गमविल्या आहेत.

पुरुष एकेरीत पाच वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने फ्रान्सच्या पॉल हेन्री मॅथ्यूचा 6-4, 6-3, 6-3 असा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. फेडररला विजय मिळविण्यासाठी फारसे झगडावे लागले नाही. फेडररच्या खेळातील सातत्य वाखाणण्याजोगे होते, तसेच त्याच्या सर्व्हिसही लक्षवेधक होत्या. त्याने तेरा बिनतोड सर्व्हिस टाकल्या.

स्विडनच्या रॉबिन सॉडर्लिंगने हॉलंडच्या थिएमो डी बेकर याच्यावर 6-2, 6-3, 6-3 अशी मात केली. आता त्याने आणि फेडरर यांनी चौथ्या फेरीत विजय मिळविल्यास या दोघांतील उपांत्यपूर्व लढत सर्वांत लक्षवेधक ठरेल. फेडररचा चौथ्या फेरीतील प्रतिस्पर्धी ऑस्ट्रियाचा तेरावा मानांकित जर्गन मेल्झर आहे, तर सॉडर्लिंगची लढत स्पेनच्या अल्बर्ट मॉन्टेनस याच्याशी होईल. मेल्झरने काल स्पेनच्या 22व्या मानांकित जुआन कार्लोस फेरेरोला 7-5, 6-3, 6-1 असे हरविले. पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोवाक योकाविक याचीही आगेकूच कायम राहिली आहे. त्याने काल सुरेख खेळ करीत अमेरिकेच्या जेम्स ब्लॅक याला 6-1, 7-6, 6-3 असा पराभूत करून चौथ्या फेरीत प्रवेश केला.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: