Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

एसटी महामंडळात भत्ता मिळतो पाच रुपये
अमोल ढोणे, यवतमाळ
Monday, September 06, 2010 AT 12:37 AM (IST)
झपाट्याने बदलणाऱ्या काळात तग धरून राहण्यासाठी "कार्पोरेट कल्चर' आत्मसात करण्यास सुरवात केलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मोठे बदल होत आहेत. मात्र, या महामंडळाचा महत्त्वाचा कणा असलेल्या बसचालक आणि वाहकांना आजही एखाद्या गावी मुक्कामाकरिता केवळ पाच रुपये निवास भत्ता देण्यात येतोय. कधी बदलणार ही परिस्थिती ?

संपूर्ण महाराष्ट्राची आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी बसच्या चालक आणि वाहकांना आजही मुक्कामी असलेल्या गावात एसटी बसच्या टपावर झोपून रात्र काढावी लागते. एवढेच नव्हे तर आजच्या परिस्थितीत जिथे पाच रुपयाला एक कप चहाही मिळत नाही, तिथे त्यांना पाच रुपये एका दिवसाचा मुक्काम खर्च देण्यात येतो. त्यामुळे संपूर्ण राज्यातील 50 हजार चालक, वाहक या भत्त्यामध्ये वाढ होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत; परंतु महामंडळ तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत त्यांच्या मागण्यांना नेहमीच केराची टोपली दाखविण्यात येते.

असा मिळतो मुक्कामाचा भत्ता
एसटीची बस म्हटलं की प्रत्येक खेड्यापाड्यातून अगदी पहाटेपासून तिची सेवा उपलब्ध असते. त्यामुळे मोठ-मोठ्या महानगरांपासून ते अगदी अडगळीतील गावापर्यंत सर्वच ठिकाणी एसटीच्या बस मुक्कामाकरिता असतात. मात्र, या बसवर मुक्कामाकरिता जाणाऱ्या चालक, वाहकांना त्याकरिता मिळणाऱ्या भत्त्यात चहा पिणेही मुश्‍किल असते. या तुटपुंज्या पैशात न्याहारी किंवा जेवणाचा विचारच केला जाऊ शकत नाही.

मुक्कामासाठी मिळणारा भत्ता
ठिकाण -चालक-वाहक
तालुक्‍याचे ठिकाण-6 रुपये-6 रुपये
जिल्ह्याचे ठिकाण-7 रुपये-7 रुपये
महापालिका-9.50-रुपये 9.50 रुपये

अतिरिक्त भत्ता मिळतो पैशामध्ये
याव्यतिरिक्त दिवसभरात केलेल्या प्रवासाच्या बदल्यात किलोमीटरच्या प्रमाणातही काही भत्ता देण्यात येतो. हा भत्ता आजही केवळ अत्यल्प पैशाच्या प्रमाणात देण्यात येतो. एका दिवशी 150 किलोमीटर प्रवास केल्यास चार रुपये, 150 ते 200 किलोमीटरपर्यंत 10 पैसे प्रतिकिलोमीटर, 201 ते 225 किलोमीटरपर्यंत 15 पैसे प्रतिकिलोमीटर आणि 225 किलोमीटरच्या पुढे 20 पैसे प्रतिकिलोमीटर याप्रमाणे वाहक, चालकांना अत्यल्प भत्ता देण्यात येतो.

कनिष्ठ वेतनश्रेणीधारकांची अवस्था वाईट
कनिष्ठ वेतनश्रेणी मिळणाऱ्या चालक, वाहकांना अत्यल्प भत्त्यावर समाधानी राहावे लागते.
त्यांना मिळणारा भत्ता पुढीलप्रमाणे.
ठिकाण-चालक-वाहक
तालुक्‍याचे ठिकाण-3 रुपये-3 रुपये
जिल्ह्याचे ठिकाण-3.50 रुपये-3.50 रुपये
महापालिका-5 रुपये-5 रुपये

खर्च करावा लागतो खिशातून
रात्रीच्यावेळी बाहेरगावी मुक्कामासाठी गेलेल्या बसचालक आणि वाहकांना ते घरापासून बऱ्याच लांब जावे लागते. त्यामुळे तिथे बस सोडून घरी मुक्कामाला जाणे शक्‍य नसते. त्यामुळे तिथेच मुक्काम करावा लागतो. अशावेळी रात्रीचे जेवण, सकाळची न्याहारी आणि चहा हा सर्व खर्च मुक्कामासाठी मिळणाऱ्या भत्त्यामध्ये निभावणे अशक्‍य असते. त्यामुळे दुसरा काही पर्याय नसल्यामुळे हा सर्व खर्च चालक-वाहकांना स्वत:च्या पैशातून करावा लागतो. अगोदरच इतरांच्या तुलनेने कमी पगार असलेल्या या कर्मचाऱ्यांची या खर्चामुळे परिस्थिती अधिकच हालाकीची होते.

उत्पन्न कमाविणाऱ्यांचीच थट्टा
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संपूर्ण राज्यात 31 विभाग आहेत. त्यात एकूण 247 आगार आहेत. या आगारातून 17 हजारांच्या वर बसगाड्या राज्यासह इतर राज्यात धावत असतात. महामंडळाच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 10 हजारांच्या घरात आहे. त्यात चालक आणि वाहकांची संख्या सुमारे 50 हजार आहे. राज्य परिवहन मंडळासाठी उत्पन्न कमाविण्याच्या कामात या चालक वाहकांचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, महामंडळ या चालक, वाहकांना मिळविणारे वेतन आणि भत्ते वाढवून देण्याकडे कायम दुर्लक्षच करीत आले आहे.

रात्र काढावी लागते बसच्या टपावर
बसगाडीसह मुक्कामी असणाऱ्या वाहक, चालकांना विश्रांती करता यावी, याकरिता प्रत्येक आगारात विश्रामगृह असणे गरजेचे आहे; परंतु कित्येक आगारांमध्ये ही व्यवस्थाच उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी विश्रांतीगृह आहे, तिथे पलंग उपलब्ध नसतात. जर पलंग उपलब्ध असेलच तर त्यावर गाद्या उपलब्ध नसतात. स्वच्छतागृहांचा तर विचारच न केलेला बरा. या सर्व अडचणींमुळे नाइलाजास्तव त्या वाहक, चालकांना हिवाळा, पावसाळ्यात बसमधील सिटांवर, तर उन्हाळ्यात बसच्या टपावर रात्र काढावी लागते. खेडेगावात मुक्कामी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर शेकडो अडचणींना सामोरे जावे लागते. कारण, त्या ठिकाणी पर्याय म्हणून दुसरा कुठलाच मार्ग उपलब्ध नसतो.

इतर विभागाशी तुलनाच नको
शासनाच्या इतर विभागात कार्यरत असलेल्या चालकांसोबत एसटीच्या वाहक, चालकांची तुलना होऊ शकत नाही, इतका कमी पगार या कर्मचाऱ्यांना मिळतो. एसटीव्यतिरिक्त इतर कुठल्याही शासकीय विभागात कार्यरत असलेल्या चालकांना अत्यल्प कामासाठी 20 ते 25 हजारांच्या घरात वेतन मिळते. याशिवाय कुठल्याही कार्यालयाचा एखादा अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी बाहेरगावी जात असेल, तर त्यांचा एका दिवसाचा खर्च 500 ते 1हजार रुपयांच्या घरात असतो. याशिवाय इतर ठिकाणी चालकांचे भत्तेही त्यांच्यापेक्षा फार जास्त असतात. त्यामुळे एवढे जास्त काम केल्यानंतरही इतर विभागाएवढे वेतन एसटीच्या कर्मचाऱ्यांना का नाही, असा प्रश्‍न एका चालकाने केला.

उत्पन्न वाढूनही परिस्थिती "जैसे थे'
अगदी काही वर्षापूर्वी एसटी महामंडळ तोट्यात असल्याने त्याचे खासगीकरण करण्याच्या चर्चेला ऊत आला होता. मात्र, ही बाब गांभीर्याने घेत संपूर्ण एसटी कर्मचाऱ्यांनी जिवाचे रान करीत महामंडळाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नात वाहक, चालकांचा अतिमहत्त्वाचा वाटा होता. याचाच परिणाम होऊन गेल्या वर्षापासून तोट्यात असलेली एसटी तीन वर्षांपासून नफ्यात आली आहे. मात्र, असे असतानाही यात मोलाची भूमिका बजावणारे चालक-वाहक आजही त्याच परिस्थितीत आहेत.

संपूर्ण खर्च नव्हे; केवळ टोकन
भत्ता हा पगाराव्यतिरिक्त दिला जातो. चालक आणि वाहकांचा मुक्कामाच्या ठिकाणी होणारा संपूर्ण खर्च कधीच दिला जात नाही. मुक्कामासाठीचा हा भत्ता केवळ टोकन म्हणून असतो. त्यांना वेगवेगळे असे एकूण 24 प्रकारचे भत्ते दिले जातात आणि त्याचा दर हा कामगार संघटनेशी चर्चा करून ठरविण्यात येतो. मुक्कामाचा भत्ता खूपच कमी आहे, असा आक्षेप कामगार संघटना कधीच घेत नाही, याचा अर्थ ही रक्कम कामगारांना मान्य आहे असा होतो, अशी भूमिका महामंडळातील उच्चाधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना घेतली.
प्रतिक्रिया
On 9/6/2010 4:34 PM Ahirrao Dhoble said:
आता जेंव्हा वाहक उरलेले सुटे पैसे परत न करता दुसरीकडे पाहतील तेंव्हा मला त्यांची कीव वाटेल. पण पुष्कळ वाहक अस करीत नाही.
On 9/6/2010 1:02 PM ganesh said:
बाजीराव चूक आहेत
On 9/6/2010 11:04 AM diensh mahajan said:
आपले खासदार संसदेमध्ये स्वताच्या वेतनवाढी साठी फार गदारोळ करतात, त्यांना जर जराही शर्म असेल तर त्यांनी याबद्दल आवाज उठवावा.
On 9/6/2010 10:49 AM Amrut said:
बाजीराव पाटील साहेब तुम्ही म्हणता कि वाहक पैसे परत देत नाहीत असे म्हणता. थोडा विचार करा बरे कि ते असे का करत असतील? ५ आणि १० रुपयांमध्ये ते कसे काय राहणार? ५ रुपयांना साधा चहा पण मिळत नाही. हेच जर त्यांना पैसे ठीक मिळत असते तर त्यांनी तुमचे चिल्लर पैसे दिले असते. आणि जर ते देत नसतील तर तुम्ही जाऊन मागा त्यांच्याकडे. असो.. goverment नि लक्ष दिले पाहिजे या गोष्टीकडे. अमृत
On 9/6/2010 8:29 AM Bhushan Jadhav said:
I think you get this info now. but this kind of lot of problems they are facing.(Conductor/Driver). Today my dad also a Bus Conductor.. i know what kind of problems they are facing. Overtime also reduced. and one thing-ST Never gone in LOSS. lot of peoples travel through S.T. B'Coz its safe way to travel anywhere in MH. My Dad doing long roots duties also for few overtime. but overtime also reduced from last 6-10 months. if you really want REALITY abt S.T Take a interview of Conductor/Driver.
On 9/6/2010 5:16 AM बाजीराव पाटील said:
बरेच वाहक प्रवाश्यांचे चिल्लर पैसे स्वतःहून कधीतरी परत देतात का ?
On 06-09-2010 04:11:00 Aarti said:
एकी कडे खासदारांना उलटी येई पर्यंत पैसा मिळतोय आणि दुसरी कडे हे !!! वाईट आहे...
On 9/6/2010 1:55 AM paresh said:
really ashamed by reading all this !! recently i read about Indian MLA's who fight for increment of their salary up to 80,000/- ( who are practically doing nothing for our country ) and demanding more facilities which they are actually not eligible with... and on other side the common man of India is surviving hardly ( above example of ST employees ) ... is Indian government really cares for an common Indian man .????


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: