आरोपींसोबत पोलिसांची इफ्तार पार्टी
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 06:26 PM (IST)
नगर- जातीय सलोखा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नगरच्या झेंडीगेट भागात पोलिसांनी आयोजित केलेली इफ्तार पार्टी पोलिसांसाठी चांगलीच अडचणीची ठरली. पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांना आरोपींसमवेत बसण्याची वेळ आल्याने ते संतप्त झाले. या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना शिस्तभंगाची नोटीस काढण्याचे आदेशही त्यांनी दिले; मात्र काही वेळात विचार बदलल्याने केवळ तोंडी समज देण्यावर प्रकरण मिटले.
शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी झेंडीगेट भागात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांना बोलाविण्यात आले होते. त्या भागातील नागरिक आणि पत्रकारांनाही निमंत्रणे गेली. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळ आधी पोलिस अधीक्षकांना माहिती मिळाली, की कार्यक्रम आयोजित करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, खंडणी, अपहरण, मारामाऱ्या, पोलिसांवर हल्ला करणे, असे कित्येक गुन्हे दाखल आहेत. ऐन वेळी कार्यक्रम रद्द करणेही शक्य नव्हते. त्यामुळे कृष्ण प्रकाश तेथे गेले; मात्र या लोकांकडून सत्कार स्वीकारणार नसल्याचे व त्यांना आपल्यापासून दूर ठेवण्यात यावे, अशा सूचना त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार कार्यक्रम झाला. मौलानांकडून सत्कार स्वीकारून वेळ मारून नेण्यात आली; मात्र आपल्या हातून सत्कार का नाही, असा प्रश्न करून मुख्य संयोजक असलेल्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जतही घातली.
या सर्व प्रकारामुळे पोलिस अधीक्षक चांगलेच संतापले. त्यामुळे पोलिसांनी, या कार्यक्रमाला किमान प्रसिद्धी तरी मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. एरवी उपक्रमांना चांगली प्रसिद्ध द्या, अशी विनंती करणाऱ्या पोलिसांनी पत्रकारांना या कार्यक्रमास प्रसिद्धी न देण्यासंबंधी विनंती केली. तोपर्यंत ही बातमी कानोकानी शहरभर पसरली होती. काहींनी यासंबंधी पोलिस अधीक्षकांकडे नाराजीही व्यक्त केली. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी या प्रकाराला जबाबदार धरून संबंधित पोलिस निरीक्षकास शिस्तभंगाची नोटीस काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार नोटिशीचा मसुदा तयार झाला. ही गोष्टही प्रसिद्धिमाध्यमांना कळावी म्हणून पद्धतशीरपणे ती त्यांच्यापर्यंत पोचविण्यात आली. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे बातम्यांची वेळ टळून गेली होती. शेवटी रात्री उशिरा नोटीस सहीसाठी आल्यावर पोलिस अधीक्षकांनी विचार बदलला व "नंतर पाहू' असे म्हणत प्रकरण बाजूला ठेवले. संबंधित अधिकाऱ्याला तोंडी समज देण्यात आल्याची माहिती मिळाली.
आयोजनातील घाई नडली
इफ्तार पार्टी आयोजित करण्याचा प्रस्ताव जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आला, तेव्हा अनेक संघटना यासाठी पुढे सरसावल्या. कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यासाठी सर्वच उत्सुक असण्यात काही गैर नाही. त्यातही पोलिसांकडे वशिला लावून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार झाला. तोच पोलिसांना अडचणीचा ठरला.