औरंगाबाद - लॉटरीचे तिकीट न घेताच एका महिला डॉक्टरला 5 लाख पॉण्डची लॉटरी लागल्याचे प्रमाणपत्र घरपोच मिळाले तर दुसऱ्या एका तरुणाला मोबाईलवर "एसएमएस'द्वारे 15 लाख रुपयांची लॉटरी लागली असून, बॅंकेच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. महिला डॉक्टरला शंका आल्याने तातडीने पोलिसात धाव घेतली मात्र तरुणाने दहा हजार रुपये गमावल्यानतंर पोलिस ठाण्यात धाव घेतली! यामुळे त्याची आणखी होणारी लुबाडणूक थांबली. ही घटना उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गुन्हे शाखेच्या सायबर सेलमधून या दोघांना प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन घेतले असता, तो क्रमांक पाकिस्तानमधील असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महूनगर येथील रहिवासी राजेश वानखेडे यांच्या मोबाईल क्रमांकावर पंधरा वीस दिवसांपूर्वी एक "एसएमएस' आला की, "तुम्हाला 15 लाखांची लॉटरी लागली आहे, पुढील बाबींची पूर्तता करावी' हा संदेश वाचल्यानंतर राजेश वानखेडे आनंदित झाला. त्याने "एसएमएस' पाठवणाऱ्याच्या नंबरवर फोन केला असता, तिकडून त्याला स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा एक खाते क्रमांक देऊन त्यावर 10 हजार 600 रुपये भरुन मोबाईल दोन दिवस बंद ठेवण्यासाठी सांगण्यात आले. मित्रमंडळी, नातेवाइकांकडून पैसे जमा करून त्याने सांगितलेल्या खाते क्रमांकावर ही रक्कम भरून टाकली आणि आपला मोबाईल दोन दिवस बंद करून ठेवला. जेव्हा पुन्हा मोबाईल सुरू केला तेव्हा त्याच क्रमांकावरून पुन्हा "एसएमएस' आला की, 20 हजार 900 रुपये बॅंक खात्यावर भरा, दोन दिवसांत आमचे व्यवस्थापक विमानाने तेथे येऊन तुम्हाला धनादेश देतील. पैशांच्या आशेने पुन्हा राजेश वानखेडे पैशाची जुळवाजुळव करत फिरत असताना उत्साहात त्याने त्यांचे परिचित पोलिस निरीक्षक संतोष डोनर यांना ही "आनंदा'ची बातमी सांगितली. त्यांना प्रकार तात्काळ लक्षात आला. त्यांनी त्याला सर्व समजावून सांगून फसवला गेल्याचे सांगताच त्याचे डोळे उघडले. उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डोनर यांनी संबंधित मोबाईल कोणत्या भागातील आहेत, याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडे प्रकरण सोपवले. त्यांनी या दोन्ही मोबाईल क्रमांकाचे लोकेशन घेतले असता, ते पाकिस्तानमधील सीमकार्ड असल्याची माहिती समोर आली. या क्रमांकावर संपर्क साधण्याचा नंतर प्रयत्न केला असता, ते बंद करून ठेवण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोनर यांनी सांगितले.
दुसरी घटना श्रेयनगरातील द्वारकापुरी येथे राहणाऱ्या डॉक्टर महिलेबाबत घडली. डॉ. दीपाली मोरे यांच्या पत्त्यावर एक पाकीट आले. त्यात डॉ. मोरे यांना 5 लाख पौण्डची लॉटरी लागल्याचे प्रमाणपत्र देऊन ही रक्कम घेण्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण कराव्यात, असे कळविण्यात आले होते. मात्र या डॉक्टर महिलेने ही आपली फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचे ओळखून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या दोन्ही घटनांमध्ये लॉटरी लागल्याचे कळविणाऱ्यांचे मोबाईल लोकेशन घेतले असता, ते पाकिस्तानमधील सीमकार्ड असल्याची माहिती समोर आली. अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक करण्यात आली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
फसव्या मेलपासून सावध राहणे योग्य
मोबाईलवर अनोळखी नंबरवरून लॉटरी लागल्याचे कळविल्यानंतर आपण लॉटरीचे तिकीट न घेताच कशी लॉटरी लागली, याचा तरी किमान विचार केला पाहिजे. तसेच लॉटरी लागल्याचे थेट घरपोच प्रमाणपत्र आल्यानंतर आपणास घरपोच प्रमाणपत्र आले, याचा अर्थ नक्कीच लॉटरी लागली असावी, असा सर्वसाधारण समज करून घेतला जातो तर काही चौकस व्यक्तींना आपण काहीच न करता कशी लॉटरी लागली, असा प्रश्न पडतो. अशा प्रकारचे फसवे मेलही येतात. ते उघडून त्यात एक एक माहिती भरत जातो आणि नकळत सायबर क्राईम करणाऱ्या हॅकरच्या जाळ्यात आपण कधी अडकतो हे मेल चेक करणाऱ्यांना कळत नाही. यासाठी असे मेल न उघडलेलेच बरे आणि जर उघडले तर तात्काळ डिलीट करावे, असे पोलिस निरीक्षक डोनर यांनी सांगितले.