"वर्षा'वर धमकी देणाऱ्याकडे "व्हीआयपीं'चे नंबर्स
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 12:30 AM (IST)
मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धमकीचा फोन केल्याप्रकरणी अटक केलेल्या अब्दुल गनी शहाकडे अनेक वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांचे दूरध्वनी क्रमांक आढळले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी आज दिली. धमकी देण्यासाठी वापरलेल्या मोबाईलचे सीमकार्ड शाहने यादव या नावाच्या बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी केल्याचेही उघड झाले आहे.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या "वर्षा' या निवासस्थानी फोन करून आपण अल् कायदाचा सदस्य असल्याची बतावणी करणाऱ्या शाह याला कालच (ता. 4) "एटीएस'च्या मुंबई व नाशिक येथील तुकड्यांनी मालेगाव येथून अटक केली. तपासणीत त्याच्याकडील फोन डायरीमध्ये अनेक राज्यांतील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचे व मंत्र्यांचे दूरध्वनी क्रमांक आढळले आहेत. त्याने याआधीही काही उच्चपदस्थांना फोन करून धमकावल्याचे पुढे येत आहे. याबाबत सध्या तपास सुरू आहे. अधिक चौकशीसाठी त्याची पोलिस कोठडी मागण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्याकडे एकूण आठ सीमकार्ड सापडले आहेत. ते बनावट कागदपत्रांद्वारे मिळविण्यात आल्याची माहिती मारिया यांनी दिली. तसेच "वर्षा'वर धमकी देण्यासाठी वापरलेल्या मोबाईलचे कार्ड बनावट कागदपत्रे देऊन मिळविले होते, त्यामुळे सीमकार्ड विक्रेता व कंपनीनेही याबाबत सर्वेक्षण केले की नाही हाही पडताळणीचा विषय आहे. शाहला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही त्यांनी सांगितले.
यादवचीही चौकशी धमकीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून हरिश्चंद्र यादव नावाच्या व्यक्तीला काल (ता. 4) अटक केली आहे. त्याला आज रात्री आठच्या सुमारास मुंबईत आणल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख हिमांशू रॉय यांनी दिली; मात्र "एटीएस'च्या पाहणीत यादवच्या नावाची कागदपत्रे सादर करून शाहने सीमकार्ड मिळविल्याचे पुढे येत आहे. याबाबत अधिक माहिती देताना रॉय यांनी सांगितले, की तो मोबाईल काही काळ यादवने; तर काही काळ शाहने वापरल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या चौकशीनंतर त्याच्या सहभागाबद्दल खुलासा होईल.
|
|