'अभाविप'च्या विजयाने भाजपमध्ये आनंद
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Monday, September 06, 2010 AT 12:45 AM (IST)
नवी दिल्ली - दिल्लीच्या राजकारणाची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या दिल्ली विश्वविद्यालयाच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणित "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे'ने जोरदार पुनरागमन करीत कॉंग्रेसच्या "एनएसयूआय'कडून चारपैकी तीन जागा हिसकावून घेतल्या आहेत. यामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातीने लक्ष घातल्याने यंदाच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. ""हे निकाल म्हणजे कॉंग्रेसच्या "खानदानी प्रिन्स'ला मिळालेला धडा आहे. असे नेतृत्व देशावर लादू पाहणाऱ्या कॉंग्रेसने त्यापासून बोध घ्यावा, ही अपेक्षा आहे,'' अशा शब्दांत भाजपने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या भाजपने "अभाविप'च्या माध्यमातून यंदाच्या निवडणुकीत जोर लावला होता. राष्ट्रकुल स्पर्धांतील महाघोटाळ्यासारख्या मुद्यांवर त्यांच्या प्रचाराचा रोख होता. स्वतः राहुल यांनी लक्ष घातल्याने "एनएसयूआय'नेही प्रचारात सर्वस्व ओतले होते. राहुल व प्रियंका गांधी हे दोघेही याच विश्वविद्यापीठाचे (सेंट स्टीफन्स महाविद्यालय) माजी विद्यार्थी आहेत. निवडणुकीच्या काही प्रचारसभांमध्ये राहुल यांनी भाग घेतल्याने वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, शनिवारी (ता. 4) जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये महत्त्वाच्या तिन्ही पदांवर "अभाविप'ने चारपैकी तीन जागांवर स्पष्ट यश मिळविल्याचे स्पष्ट झाले. अध्यक्षपदी जितेंद्र चौधरी, उपाध्यक्षपदी प्रिया डब्बास व सचिवपदी नीतू डब्बास यांची निवड झाली.
"एनएसयूआय'च्या अक्षयकुमार यांनी सचिवपदी एकमेव विजय मिळविला. दिल्ली विश्वविद्यालयात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते व "अभाविप'च्या अभिनंदनाचे फलक ठिकठिकाणी झळकत होते. विजयी उमेदवारांची आज दुसऱ्या दिवशीही जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मनातील उद्याचा भारत हा रिबॉकचे बूट घालून मजुरांबरोबर छायाचित्रे काढणाऱ्या नेत्यांना भुलत नाही, तर स्वामी विवेकानंद व भगतसिंग यांचा वारसा तो महत्त्वाचा मानतो, असा टोला भाजपने राहुल गांधी यांना उद्देशून लगावला आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील चित्र कसे असेल, याची ही नांदी असल्याचेही भाजपचे म्हणणे आहे. पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी, अरुण जेटली यांनी विजयी विद्यार्थी नेत्यांचे अभिनंदन केले.
दिल्लीच्या राजकारणात विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांना मोठे स्थान असते. राष्ट्रीय पातळीवरील नेते घडविण्याची शाळा म्हणजे या निवडणुका मानल्या जातात. आणीबाणीच्या काळात याच विद्यार्थी संघटनांनी दिल्लीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रकाश व वृंदा कारत, कपिल सिब्बल, अरुण जेटली, विजय गोयल, शशी थरूर, सज्जनकुमार आदी अनेक नेते याच संघटनांच्या माध्यमातून पुढे आल्याने सर्वपक्षीय राजकारणावर विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका प्रभाव पाडतात. निवडणुकीतील प्रचाराचे अनेक मुद्देही राष्ट्रीय राजकारणाचेच असतात. दिल्ली विश्वविद्यालयात कॉंग्रेस-भाजपचे, तर जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात डाव्या विद्यार्थी संघटनांचे वर्चस्व, असे साधारणतः चित्र राहिलेले आहे.