मुंबई - वाढती महागाई आणि शासनाच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध शासकीय कर्मचारी संघटनांनी उद्या (मंगळवारी) देशव्यापी संप पुकारला आहे. संपामध्ये सर्व सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत.
वाढती महागाई कमी करावी, २४ महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, निवृत्तीचे वय ६० करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, बोनस द्यावा अशा एकूण २७ मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे.
संप यशस्वितेसाठी पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, विक्रीकर कर्मचारी संघटना, आयटीआय निर्देशक संघटना, वनविभाग कर्मचारी, आरोग्य विभाग वर्ग तीन व चार, पशुसंवर्धन, आरटीओ कर्मचारी, सहकारी विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, वाहनचालक, भूमिअभिलेख, शिक्षण विभाग, यांत्रिक कर्मचारी, धर्मादाय आयुक्त कार्यालय, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी कंबर कसली आहे. अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननेही या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यात संपाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.