बलात्कारप्रकरणी पिंपरी भाजप उपाध्यक्षाला अटक
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 11:10 AM (IST)
पिंपरी - एका आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान उपाध्यक्षाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (ता. 5) सायंकाळी आठच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली.
सूरज रणपिसे (वय 45, रा. त्रिमूर्ती गृहरचना संस्था, योजना क्रमांक 6, इमारत क्रमांक 27) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रणपिसे याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणपिसे याने यापूर्वी एकदा महापालिकेची निवडणूक लढविली होती.