गोविंदाच्या मृत्यूमुळे ठाणे हादरले!
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 12:15 AM (IST)
ठाणे - दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यात चौथ्या थरावर राहून वरील थरांचा भार पेलणाऱ्या आणि त्यात दुखापत झालेल्या एका गोविंदाचे आकस्मिक निधन झाल्याने दहीहंडीची नगरी म्हणून नावारूपाला आलेले ठाणे हादरले आहे. ज्ञानेश्वरनगर येथील ओमसाई मित्रमंडळाचा किशोर कांबळे (वय 25) याचा थरावरून पडून झालेल्या दुखापतीने मृत्यू झाल्याने सर्व थरातून हळहळ व्यक्त होत आहे. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील कर्तासवरता युवक अशा प्रकारे अचानक गेल्याने कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यात चौथ्या थरावरील आधार होताना किशोर दोन वेळा कोसळला होता. यादरम्यान त्याला दुखापत होऊन छातीत रक्त साकाळल्याची शक्यता व्यक्त होत आहे; पण ही दुखापत त्याने सर्वांपासून लपविल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
किशोर कांबळे हा ज्ञानेश्वरनगर येथील संत रोहिदास चाळीत आईवडील आणि तीन भावंडांसह राहत होता. सर्वांबरोबर मिळून मिसळून वागणारा किशोर गोविंदा पथकामध्येही पुढे होता. परिसरातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन अजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली "ओम साई गोविंदा पथका'ची स्थापना केली होती. गेल्या तीन वर्षांपासून उत्सवाच्या आधी काही काळ सराव करून परिसरातील लहान दहीहंड्या फोडण्यासाठी हे पथक बाहेर पडत असे. यंदाही 2 सप्टेंबरला या पथकाने परिसरातील हंड्यांना गवसणी घालण्याचा प्रयत्न केला; मात्र सावरकरनगर आणि शास्त्रीनगर येथील दहीहंडीमध्ये "ओम साई'चा मानवी मनोरा कोसळला होता. या वेळी सातत्याने चौथ्या थराचा आधार असलेला किशोरही कोसळला होता. थर कोसळल्यावर दोन्ही ठिकाणी किशोर तसाच बसून राहिला होता; मात्र जवळच्या गोविंदांनी वारंवार विचारणा केल्यावरही त्याने काही दुखापत झाल्याचे सांगितले नाही. रात्री उशिरा घरी आलेला किशोर खूपच दमलेला होता; तसेच त्याला बरे वाटत नसल्याचे जाणवत होते; पण घरच्या गरीब परिस्थितीच्या दडपणापोटी म्हणा किशोरने काहीही होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर दोन दिवस सातत्याने ताप आल्याने त्याला परिसरातील डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतरही फरक न पडल्याने पुन्हा जवळच्या डॉक्टरांकडे पाठविण्यात आले. किशोरने दिलेल्या माहितीनुसार, त्याला डॉक्टरांनी औषधे दिली. काल सायंकाळीही किशोरला काही जास्त त्रास होतो आहे का, अशी विचारणा केल्यावरही त्याने नकारार्थी उत्तर दिले होते; मात्र त्याच वेळी त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागल्याने तातडीने कौशल्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे कॉट रिकामी नसल्याचे कारण दिल्यावर नौपाड्यातील ठाणे हेल्थ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण एकूणच उपचारांना विलंब झाल्याने किशोरची प्राणज्योत आज पहाटे मालवली. दहीहंडी उत्सवातील एका उमद्या गोविंदाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मोठ्या दहीहंड्या आयोजित करणाऱ्या सर्वच आयोजकांनी या दुर्घटनेबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. टेंभीनाक्यावरील दहीहंडीची धुरा वाहणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे, "संघर्ष'च्या यंदाच्या विक्रमी हंडीचे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि "संस्कृती प्रतिष्ठान'चे अध्यक्ष शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कांबळे कुटुंबीयांच्या आधारासाठी हात पुढे केला आहे. आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे, प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड यांनी कांबळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
वडील शिवाजी कांबळे -
"बाळा जाऊ नको, म्हणून सांगत होतो.'
"दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यात काहीही अघटित होऊ शकते, असे वाटल्याने किशोरला "आज तू जाऊ नकोस,' असे सारखे सांगत होतो; पण न ऐकता तो गेला. रात्री उशिरा आल्यावर तो नरम वाटत होता; पण काय होतोय हे न सांगितल्याने आम्हाला काही कळले नाही. ताप येतोय म्हणून आम्ही उपचार करीत राहिलो; पण डोळ्यासमोर तोंडातून रक्त येत तो माझ्यासमोर कोसळल्यावर माझे अवसान गळाले. मोठा बंधू व्यंकट कांबळे यांच्यासह आम्ही त्याच्यावर चांगल्या रुग्णालयात उपचारासाठी प्रयत्न केला; पण घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून जीवावरचे दुखणे लपविलेला माझ्या काळजाचा तुकडा डोळ्यांत देखत गेला हो...'' असा टाहो शिवाजी कांबळे यांनी फोडल्यावर उपस्थितांचे डोळे पाणावले.
गरिबीमुळे दुखणे अंगावर काढले
वडील ट्रक ड्रायव्हर म्हणून दुसऱ्याकडे नोकरीला. मोठा भाऊ अपंग, तर दोघे लहान अद्याप शाळेत शिकत आहेत. तुटपंज्या पैशातून संसार चालविण्याची आईपुढे विवंचना. अशा वेळी कुठेतरी लहान-मोठी नोकरी करून नुकताच कुठे किशोरने या फाटक्या संसाराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अशा वेळी आपल्याला झालेल्या दुखापतीचा आर्थिक भार कुटुंबावर पडू नये म्हणून किशोरने तोंडातून रक्त येईपर्यंत दुखणे दाबून ठेवले आणि ही सहनशीलताच त्याच्या जीवावर बेतली, अशी चर्चा परिसरात सुरू होती.
शिवसेना पाठीशी राहणार
टेंभी नाक्यावरील दहीहंडीचे आयोजक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे ः ""एका गोविंदाचा अशा प्रकारे झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. आमच्या एका पदाधिकाऱ्याचा किशोर पुतण्या आहे. तो केवळ आमच्या परिवारातीलच आहे, म्हणून नाही; तर गोविंदा उत्सवातील सहभागानंतर किशोर आपल्या कुटुंबापासून दुरावल्याची खंत आम्हाला आहे. आमदार प्रताप सरनाईक आदींसह शिवसेना या कुटुंबाच्या मागे सर्व सहकार्यासह उभी राहणार आहे; तसेच अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी कोणते प्रयत्न करता येईल याचा विचार सर्वांना सोबत घेऊन करणार आहे.''
गोविंदा पथक सर्टिफाईड करा !
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक - जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आर्थिक मदतीसह या कुटुंबाला स्थिर होण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. त्याच वेळी अशा प्रकारे लहान गोविंदा पथकाच्या गोविंदांवर जीवघेणा प्रसंग गुदरू नये, यासाठी सर्टिफाईड गोविंदा पथकाच्या मागणीचा पाठपुरवठा करणार आहे. दहीहंडीच्या आयोजकांना समन्वय समितीच्या माध्यमांतून एकत्र आणून हा प्रयत्न करणे शक्य आहे. प्रशिक्षित प्रशिक्षकांनी शिक्षण दिलेल्या पथकांनाच आपल्या उत्सवात मानवी मनोरे रचण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. सर्टिफाईड गोविंदा पथकांना प्राधान्य दिल्याने अपघात टाळणे शक्य आहे. यामुळे नियमित सरावाशिवाय उत्सवात सहभागी होणाऱ्या पथकांना आळा बसू शकेल.
"संघर्ष'ची लाखाची मदत!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड - ही घटना दुर्दैवी आहे. एका गरीब कुटुंबातील मुलाचे अशा प्रकारे निधन झाल्यावर सर्व कुटुंबावर आघात होतो. या कुटुंबाचे सांत्वन करणे कोणालाही शक्य होणार नाही. मदत म्हणून नाही, तर शेवटपर्यंत दहीहंडी उत्सव आपला श्वास मानणाऱ्या गोविंदाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना साह्य व्हावे, या उद्देशाने "संघर्ष'च्या वतीने एक लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अजय सूर्यवंशी (ओमसाई मंडळाचे अध्यक्ष) - "सावरकरनगर आणि इंदिरानगर येथील हंड्यांमध्ये आमचे मनोरे कोसळले होते. त्या वेळी आपल्याला दुखापत झाल्याचे किशोरने सांगितले नाही. गेली तीन वर्ष आम्ही दहीहंडी उत्सवात सहभागी होत आहोत; पण आमच्या पथकातील एक जण अशा प्रकारे अचानक जाईल, असे कधी वाटले नव्हते. आम्हाला सर्वांना या घटनेचा धक्का बसला आहे.''
विजय जाधव (किशोर गोविंदा पथकातील मित्र) - गोविंदाच्या तयारीसाठी किशोर नेहमी उत्साहाने पुढाकार घ्यायचा. चौथ्या थरावर तो लीलया जाऊन वरच्या थराची जबाबदारी घ्यायचा. तो सर्वांचाच आवडता होता. अजूनही तो आमच्यात नाही, यावर विश्वास बसत नाही. त्याला त्रास होत असल्याची माहितीच त्याने न दिल्याने आम्ही सारे त्याच्या दुखण्याबाबत शेवटपर्यंत अंधारात राहिलो, हे शल्य आमच्या मनात कायम राहील.
प्रशांत पालांडे (परिसरातील मनसेचे कार्यकर्ते) - किशोर कांबळेचा अशा आकस्मिक मृत्यूमुळे आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे. परिसरातील सर्व सामाजिक कार्यक्रमामध्ये त्याचा आर्वजून सहभाग असे. त्याचे कुटुंब त्याच्याकडे एक महत्त्वाचा आधार म्हणून पाहत असतानाच ही दुर्घटना घडल्याने सर्वाधिक वाईट वाटते.
मृत्यूचे नेमके कारण महिन्याने कळणार?
किशोरचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, हे समजण्यासाठी काही तपासणी अहवाल येणे अपेक्षित आहे. या अहवालांची आणि नमुन्यांची तपासणी सुमारे महिन्याभरात झाल्यावर किशोरच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल. सध्या तरी त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे नेमके स्पष्ट न झाल्याने आम्ही आमच्याकडील अहवाल राखीव ठेवला आहे. तसे खासगी रुग्णालयात त्यांच्यावरील उपचारांची माहितीही मागवून घेतली आहे, असे सिव्हिल हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. बी. नांदापूरकर यांनी सांगितले.
रुग्णालयाचे नाव -- जखमींची संख्या --- उपचार झालेले --- उपचार घेत असलेले
केईएम 167 -- 146 --- 21
कूपर 16 --- 13 --- 03
राजावाडी 35 --- 31 --- 04
शताब्दी 37 --- 37 -- 00
शीव 41 --- 29 --- 12
नायर 33 --- 31 --- 02