
पाटणा - अपहृत पोलिसांच्या सुटकेचे श्रेय नितिशकुमार सरकारने घेऊ नये, असे उपहासात्मक आवाहन राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामविलास यांनी आज (सोमवार) येथे केले.
माणुसकीच्या दृष्टीकोनातून माओवाद्यांनी पोलिसांना सोडले आहे. त्यात पोलिस आणि राज्यसरकारने कोणती भूमिका बजावली?, असा प्रश्न लालू यांनी विचारला.
माओवाद्यांना हिंसा सोडण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, हिंसा हे सर्व प्रश्नांवरील उत्तर होऊ शकत नाही. प्रश्न सोडविण्याचे अन्य अनेक मार्ग आहेत. त्यांनी यावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे.
पासवान म्हणाले, की अपहृत पोलिसांच्या सुटकेसाठी तपास मोहीम राबविण्यात सरकार आणि पोलिस पूर्णत: अपयशी ठरले आहे. केवळ माओवाद्यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे ते सुखरूप परत आले आहेत. त्यामुळे सरकार किंवा पोलिसांनी त्याचे श्रेय घेऊ नये. सरकारने पहिल्या दिवशी पाऊल उचलले असते, तर लुकास टेटे मारले गेले नसते.
पोलिसांच्या सुटकेमागे काहीतरी संकेत असावे, असा संशय लालू यांनी व्यक्त केला. तर, मी लवकरच संबंधित पोलिसांची भेट घेईल, असे पासवान म्हणाले.