Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

"महानिर्मिती'ची यंत्रणा पोखरली जातेय
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई  -  वीजनिर्मिती संचांत वारंवार होणारा बिघाड व त्यामुळे क्षमतेपेक्षा खूपच कमी होणारी वीजनिर्मिती यावर उपाययोजना करण्याबाबत अनेकदा चर्चा व निर्णय होऊनही "महानिर्मिती'च्या प्रकल्पांच्या कामगिरीत सुधारणा होत नसल्याने खुद्द कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि ऊर्जा सचिव सुब्रत रथो यांनी "महानिर्मिती'च्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्‍त करत ढिसाळ कारभाराची कठोर शब्दांत झाडाझडती घेतली आहे. आपली यंत्रणा आणि यंत्रसामग्री "पोखरली' जात असल्याचा इशाराही रथो यांनी दिला आहे.

"महानिर्मिती'च्या सृजन या गृहपत्रिकेच्या जुलै-ऑगस्ट या कालावधीसाठी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकाच्या "मनोगत'मध्ये श्री. रथो यांनी कंपनीच्या कामगिरीचा आणि त्यातील ढिसाळ कारभाराचा चांगलाच समाचार घेतला आहे. "महानिर्मिती'ची कार्यसंस्कृती व कार्यक्षमता सुधारावी, या हेतूने रथो यांनी या मनोगतामध्ये वारंवार होणारे "बॉयलर ट्यूब लिकेज', कोळसाचोरी, संच पूर्ण क्षमतेच्या आसपासही न चालणे अशा मुद्द्यांवर भाष्य करत "महानिर्मिती'ला "घरचा आहेर' दिला आहे.

आजघडीला "महानिर्मिती'चा एकही संच क्षमतेच्या आसपासही वीजनिर्मिती करत नाही. एकेका मेगावॉट विजेचे उत्पादन कसे वाढवता येईल, याचा विचार क्षेत्रीय पातळीवर होताना दिसत नाही, ही खेदाची बाब आहे. मुख्यालयात मासिक आढावा बैठकीत त्रुटींवर विचारविमर्श होतो; पण त्यातून निघालेल्या निष्कर्षावर वीज केंद्रात चर्चा होताना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच गेल्या दोन-तीन महिन्यांत क्षमतेच्या केवळ निम्मीच वीजनिर्मिती होताना दिसते, याबाबतही रथो यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. विजेचे उत्पादन कमी झाले, तर महसूल कमी म्हणजेच आर्थिक स्थिती बिकट हे सूत्र सांगत सद्यस्थितीत आपली यंत्रणा व यंत्रसामग्री पोखरली जातेय, असा इशाराही रथो यांनी दिला आहे.

कोळसाचोरीला आळा घालण्याची व कोळसा हाताळणी यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याची तीव्र गरज रथो यांनी व्यक्‍त केली आहे. तसेच कोळसाचोरी, कंपनीला पोखरून टाकू शकते, अशी भीतीही व्यक्‍त केली आहे. अखेरीस कंपनीप्रति आपली निष्ठा, संघभावना, एकात्मता कमी झालेली तर नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही रथो यांनी दिला आहे.
प्रतिक्रिया
On 9/6/2010 12:11 PM Amey G said:
अशा चांगल्या नेतृत्वाची आपल्या देशाला गरज आहे.
On 9/6/2010 12:00 PM Shivaji Bhosale said:
khedachi gosht ahe आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: