Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

घनश्याम सुंदरा...
अरुण मनोहर
Monday, September 06, 2010 AT 09:20 PM (IST)
Tags: muktpeeth,  features,  stories,  katha,  arun manohar
हाट नेहमी कसा नवीन तजेला घेऊन येते! रात्रीचा अंधार कालच्या सगळ्या विवंचना, दु:खे घेऊन दूर पळून गेलेला असतो. त्या काळज्यांच्या सावल्या भले नंतर पुन्हा येवोत. पण उन्हाबरोबर परत येऊन त्यांनी मनाला अजून तरी झाकोळून टाकलेले नसते. तेव्हा हा वेळ चोवीस तासांमधला एकदम टवटवीत आणि बिनधास्त वेळ असतो. जो काही उद्योग आपण या प्राईमटाईममध्ये करू, त्यात प्रचंड सुख मिळते. कारण सुखाला अधूनमधून छेद देणाऱ्या कटकटींचे तात्पुरते का होईना, पहाटेच्या वेळेत विस्मरण झालेले असते. घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला.... मंगल वातावरणाकडे नेणारा हा पहाटेचा जादूभरा मार्ग!

काही जणांना पहाटेचा वेळ साखरझोपेत घालवून रात्रीची विश्रांती आणखी खेचायची असते. त्यात त्यांना जर सुख असेल, तर असो. या सर्वोत्तम वेळी बिछान्यावर लोळत न पडता, घरापासून जरा दूर मोकळी हवा भरभरून घेत, पाखरांची गाणी ऐकत, आळसावलेले शरीर ताजेतवाने करून नवीन दिवसाच्या रामरगाड्याला सामोरे जाणे मी पसंत करतो. जवळच्या उद्यानात गोलाकार मार्गावर जलद चालीने दहा बारा फ़ेऱ्या मारायच्या. तिथल्या व्यायामाच्या जागेत काही योगासने करून शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करायचे. या नित्याच्या फ़ेरीत कित्येकदा लिखाणाची नवी बीजे वर येतात. काही न सुटलेल्या तिढ्यांच्या गाठी उकलल्या सारख्या वाटू लागतात.
 
माझी आईदेखील पहाटे उठून माझ्याबरोबर बाहेर यायला उत्सुक असते. तिच्या ८४ वर्षे वयोमानानुसार, माझे फ़िरणे होईपर्यंत ती हळूहळू चार गोल पूर्ण करते. मग मी व्यायाम करीत असतांना उद्यानातल्या बाकावर पक्षी पहात बसून रहाते. अशा उत्साहाने रोज नवा दिवस सुरू होतो. नेहमीच्या या दिनक्रमामुळे, आजवर सकाळच्यावेळी आजूबाजूच्या वातावरणात जणू रसरशीत चैतन्याचे सडे शिंपले आहेत असे वाटायचे.

आज खरं तर माझा नेहमीप्रमाणे फ़िरायला जायचा मूड नव्हता. काल मुलाला बजावून सांगितले होते, निदान आज तरी रात्री लवकर घरी ये, आणि अभ्यास करत बस. बारावीची परीक्षा जवळ आली आहे. मित्रांबरोबर बाहेर उंडारणे बंद कर. पण ऐकतील तर ती मुले कसली? आला नेहमीप्रमाणे उशीरा आणि झोपून गेला. राग आणि हतबलता यामुळे सकाळी फ़िरायला जावेसे वाटत नव्हते. तरीही नेट लावून गेलो. पण आजची सकाळ एक वेगळीच कहाणी दाखवायला आली असावी. नंतर चिरफ़ाड करून देखील त्या कोणा एकाच्या विमनस्कतेवरचे पडदे उघडू शकले नाही. उरले फ़क्त एक मळभ. नेहमी उत्साही असलेल्या या समयाने, आज उदास मळभाचे पांघरूण ओढवून घरी पाठवले.

ट्रॅकवर फ़िरतांना एका गोलाकार बाकावर तीन तरुण मुले बसलेली दिसली. मधल्या टेबलावर दोन तीन बाटल्या, काही चकण्याची पाकीटे वगैरे सामग्री होती. तिथून माझ्या जलद चालीने जाता जाता, नजरेने व्हीस्कीची बाटली आणि सिगरेटचा तीव्र वास व धूर नेमका टिपला. या वेळी नेहमी दिसणारे म्हणजे लगबगीने कामावर निघालेले लोक, शाळेत जाणारी मुले वगैरे. सकाळच्या मंगल वेळी ओली पार्टी करणारे कोण हे रांगडे? पूर्वी कॉलेज होस्टेलवर रहायचो, तेव्हा एक मित्र होता. सकाळी उठल्याबरोबर दुसरे काही करण्याआधी तो सिगारेट शिलगवायचा. सिगारेट सारखे घाणेरड्या वासाचे धुरांडे, जाग आल्या आल्या तोंडात कोंबणे म्हणजे कमालीचे अस्वच्छपणाचे लक्षण. व्हीस्कीशी माझे वैर जरी नसले, तरी सकाळी सहा वाजता बागेत जर कोणी असली पार्टी करतांना दिसला, तर जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी संपुष्टात आल्या असाव्यात, असे वाटते.
नंतरच्या फ़ेरीत जरा बारकाईने पाहिले. कोण हे प्राणी? इथल्या टिपिकल तरुणांसारखेच दिसत होते. दोघांची स्थूल अंगकाठी, गबाळे टी शर्ट, ढगळ अर्धी चड्डी, विस्कटलेले केस. चिनी भाषेत तिरमिरीने कसल्याशा गप्पा करीत होते. तिसरा मात्र इथल्या नॅशनल सर्विसचा पूर्ण कडक गणवेष घालून होता. त्याचेही या दोघांच्या साथीला नाममात्र पिणे सुरू होते. तो बोलतही नव्हता. मधेच तो एक फ़ेरी मारून पुन्हा त्यांच्यात येऊन बसला. तो पर्यंत बाटली जवळ जवळ पूर्ण संपली होती. या दोघांची काही तरी प्रॉब्लेमवर चर्चा सुरू असावी. नॅशनल सर्विसवाला जिवाभावाचा दोस्त असल्यामुळे त्याला यांच्या अडचणीच्या वेळेस जवळ रहायचे असावे. मला कळेचना, अशी काय परीस्थिती असेल? हे लोक मंगलसमयी तीर्थप्राशन करून कोणत्या देवाचे आशिर्वाद मागत असतील?

व्यायाम संपल्यावर मी आणि आई त्यांच्या टेबलपासून जरा दूरच्या बाकावर बसलो होतो. दोघांचा नॅशनल सर्विसवाला मित्र आणखी एक फ़ेरी मारत होता. या जाड्यांचे पिणे आता संपले होते. त्यांच्या अगम्य चर्चा थंडावल्यासारख्या वाटत होत्या. त्यातल्या एकाने अचानक दुसऱ्याला घट्ट मिठी मारली, आणि हमसाहमशी रडू लागला. दुसरा त्याच्या पाठीवर, केसांवर ममतेने हात फ़िरवीत होता. खांद्यावर पडणारे मित्राचे कढत अश्रु यांच्या डोळ्यात जमा व्हायला लागले. आम्ही होतो त्या अंतरावरून देखील मला त्याचे ओक्साबोक्शी रडणे ऐकू येत होते. कदाचित माझ्या आईला रडण्याचा आवाज ऐकू आला नसावा. रडणारा तरूण पाठमोरा असल्याने तिला चेहरा दिसतही नव्हता. तिने येवढेच पाहिले, दोन तरूण मुले मिठीत एकमेकांना गोंजारीत आहेत. तिला काय वाटले असेल कोण जाणे! तिने माझ्याकडे शरमेने पाहून इथे कसले कसले विचित्र प्रकारचे लोक असतात! असा भाव दाखवला. मला मात्र त्याचा हंबरडा ऐकू आल्यामुळे एकदम भरून आले. काय अडचण असेल त्या बिच्याऱ्याची? नोकरी गमावली असेल, की कोणी जिवाभावाचे सोडून गेले असेल? की बायकोचे भांडण घटस्फ़ोटापर्यंत आले असेल? सकाळच्या प्रहरी नशेच्या बाटलीत दु:ख बुडवायचा प्रयत्न करण्याखेरीज दुसरा काही मार्ग त्याला सुचला नसेल? त्या जाड्या मित्रालाही किंवा त्या शुद्धीत असलेल्या नॅशनल सर्विसवाल्याला देखील नाही? आणि अशा प्रसंगी घरच्या लोकांच्या ऐवजी मित्रांचे पाठबळ त्याने का घेतले असावे?

आधी बजावून देखील मुलगा काल रात्री उशीरा घरी आला, म्हणून मी खूप वैतागलो होतो. इतका, की आजच्या प्रसन्न सकाळी देखील अधूनमधून ती बोच दुखवत राहिली. एकीकडे माझा फ़ुटकळ इगो मी गोंजारत बसलो होतो. एकीकडे हे दोघे न जाणे कशा प्रकारचे भीषण दु:ख एकमेकांमध्ये कवटाळून रडत होते! प्राजक्ताचा सुवास उधळत आलेली घनश्याम सुंदराची सकाळ, उमलत्या उन्हात मलूल झाली होती.

प्रतिक्रिया
On 28/09/2010 06:45 PM Sameer said:
लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे तेच कळले नाही. त्यांचा प्रोब्लेम त्यांनाच माहित .... त्यांनी निदान ती मुले का रडत होती त्याची तरी चौकशी करायची होती म्हणजे काही तरी अर्थ बोध झाला असता. ( लेखकाच्या विचारांचा ) :-)
On 25/09/2010 08:57 PM girish said:
सकाळच्या मंगल समयी वातावरण छान असते म्हणून हा माणूस त्याच्या आईबरोबर नेहमीप्रमाणे फिरायला आला पण आज त्याला ते विचित्र दृश्य दिसले आणि त्याचा मूड गेला. रोजच्याप्रमाणे फिरण्याची मजा घेता आली नाही. एवढाच लेखाचा मतितार्थ दिसतो. मात्र बडबड बंद कर देना अफगाणिस्थान यांच्या प्रतिक्रियेचा अर्थच समजला नाही. लेखाशी काहीच संबंध दिसत नाही. कि हे पण तीर्थप्राशन करून प्रतिक्रिया लिहायला बसले?
On 9/15/2010 9:13 PM गणपत भीमराव, रा मौरीश्स said:
अतिशय चित्तवेधक आणि मनमोकळा लेख आहे. चीनी लोक सारसबागेत सकाळी सकाळी प्यायला बसले हे चूक आहे. मुलगा बारावीला आहे. तसा बारावीला काही अर्थ राहिला नाही. CAT कडे जास्त फोकस करा. गणपत भीमराव, रा मौरीश्स
On 14/9/2010 4:36:34 PM swati said:
kashacha कशाशी काही संबंध नाही असे लेख sakalmadhye छापू नयेत असे वाटते varnanavarun लेखक इथे राहत नाही असे वाटते उगाच काहीच्या काही लिहिले आहे.
On 9/13/2010 6:25 PM बडबड बंद करदेना,अफगाणिस्तान said:
मी अन यार्देना जिवाभावाच्या सख्या! जिथे ती तिथे मी. आता काळाने आम्हाला थोडे दूर ठेवले आहे,पण म्हणून आम्ही थांबलो नाही. जिथे बातमी तिथे आम्ही या न्यायाने बनावट कमेंट्सचा पाऊस पडतो आम्ही. यार्देना गेले करोड वर्षे बेंचवर आहे,माझ्यासारखीच! आम्ही दोघींनी इस्राएल-अफगाणिस्तानची फाळणी,पुनर्बांधणी,युद्धे, अश्मयुग,डायनोसोरची अंडी इतकेच काय तर ए.के.हंगल साहेबाना ड्रायविंग लायसेन्स काढताना (म्हणजे ते १८ वर्षाचं होते तेंव्हा) पाहिले आहे. आहे कि नाही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एलिजिबल एन्ट्री?मंग??
On 9/11/2010 6:48 PM tom said:
१ नंबर
On 9/10/2010 11:37 PM सुनीर said:
sasonkar yardena israel , तुम्हाला प्रतिक्रियांमध्ये परत पाहून आनंद झाला . तुम्ही लिहित का इथे , तुमच्या प्रतिक्रिया दुसर्यांपेक्षा वेगळ्या ओळखून येतात.
On 9/8/2010 1:54 PM yogee said:
लेख सुरुवातीलाच बरा वाटला .. नतर लेखकाला काय सांगयचे काही कळतच नाही ..नाही आवडला ...
On 9/7/2010 11:19 PM pallavi said:
लेखाचा सुरुवातीचा काही भाग वाचून लेख चांगला असेल, असे वाटले होते. परंतु पुढे वाचत गेले तशी निराशा होत गेली. हा लेख लिहून लेखकाने काय साध्य केले आहे ? धडा न जोडाचा लेख आहे.
On 9/7/2010 7:50 PM anant manohar said:
कदाचित ते रात्रीपासून बसले असतील. तुम्ही सकाळी गेला म्हणून तुम्हाला आता दिसले. प्रत्येकाची द्दुखे वेगवेगळी असतात . खूप आवडला नाही.
On 9/7/2010 6:08 PM charu said:
लेख चांगला आहे - पण मला थोडा विसंगत वाटला. हे सर्व कोठे घडले हे कळले असते तर काही तरी संदर्भ लागला असता. 'कोण हे प्राणी? इथल्या टिपिकल तरुणांसारखेच दिसत होते...चिनी भाषेत तिरमिरीने कसल्याशा गप्पा करीत होते. तिसरा मात्र इथल्या नॅशनल सर्विसचा पूर्ण कडक गणवेष घालून होता.' वगैरे - यातून काय अर्थबोध होतो? बरे यांचा मुलगा देखील बारावीला आहे म्हणतात ...??
On 9/7/2010 5:47 PM me said:
मला नाही आवडला बाबा हा लेख काहीतरीच होता....
On 9/7/2010 8:55 AM sasonkar yardena israel said:
अतिशय चांगला लेख. मी इझ्रेल मध्ये पहिल्यांदा आले त्याची आठवण झाली. दुसरा काही मार्ग त्याला सुचला नसेल? हे लोक मंगलसमयी तीर्थप्राशन करून कोणत्या देवाचे आशिर्वाद मागत असतील?


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: